सांगली मार्केट यार्डात रस्त्यात खड्डे की खड्डय़ात रस्ता? महानगरपालिका-बाजार समितीच्या वादात व्यापारी, शेतकऱयांचे हाल
सांगली मार्केट यार्डातील रस्ता पावसाळ्यापूर्वीच खराब झाला आहे. रस्त्यात खड्डा की खड्डय़ात रस्ता, अशी रस्त्याची दयनीय स्थिती मार्केट यार्ड परिसरात झाली आहे. खड्डय़ांचे अडथळे पार करताना वाहन चालकांची दैना होत असून, त्यात वाहतूककोंडीची भर पडत आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावरील डांबर निघून गेल्याने खडी बाहेर आल्याने दुचाकीस्वार घसरून पडण्याचे प्रकार वाढले आहेत. दरम्यान, रस्ता दुरुस्ती महापालिका आणि बाजार समितीच्या वादात थांबल्याची माहिती पुढे आली आहे.
सांगली मार्केट यार्डातील मुख्य रस्ते, पेठांमधील अंतर्गत रस्ते, असे कोणतेही रस्ते यास अपवाद राहिलेले नाहीत. खड्डय़ांमुळे पावसाळ्यात रस्त्यांवर पाणी साचत आहे. सांगली मार्केट यार्डाच्या दोन्ही प्रवेशद्वारांतच शेतकरी, व्यापाऱयांचे खड्डय़ांनी स्वागत होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या मुख्य रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून, ते भरण्याचीही महापालिका आणि सांगली बाजार समिती तसदी घेत नाही. व्यापाऱयांनी बाजार समितीकडे तक्रार करूनही त्याकडे लक्ष दिले जात नाही.
बाजार समिती प्रशासनाच्या माहितीनुसार सांगली मार्केट यार्डातून जाणारा मुख्य रस्ता महापालिकेकडे आहे. त्यामुळे तो रस्ता महापालिका प्रशासनाने दुरुस्त करून देण्याची गरज आहे; पण यासाठी महापालिकेकडे पाठपुरावाही होत नाही. यामुळे गेल्या वर्षभरापासून सांगली मार्केट यार्डातील मुख्य रस्त्यावरील खड्डे तसेच आहेत. मुख्य रस्त्याबरोबरच पेठेतील रस्त्यांवरही खड्डेच खड्डे आहेत. या रस्त्यांनाही दहा वर्षांत डांबर मिळाले नाही. एवढेच काय, तर सांगली बाजार समितीच्या मुख्य इमारतीसमोरील रस्त्यावरही खड्डेच आहेत. याकडे सांगली बाजार समितीच्या पदाधिकाऱयांनी लक्ष देण्याची गरज आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List