जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया जुलैमध्ये?
नगर जिल्हा परिषद कर्मचाऱयांच्या बदल्यांची प्रक्रिया यंदा लोकसभा निवडणूक त्यानंतर शिक्षक मतदारसंघातील निवडणूक आचारसंहितेमुळे थेट जुलै महिन्यात होण्याची शक्यता आहे. दरवर्षी मे महिन्यात जिल्हा परिषद कर्मचाऱयांच्या (शिक्षक वगळता ‘गट क’ व ‘गट ड’) बदल्यांची प्रक्रिया राबवली जाते.
सन 2023च्या बदल्या 9 मेपासून सुरू झाल्या होत्या. यंदा मात्र लोकसभेची निवडणूक असल्याने बदल्यांचा कालावधी पुढे गेला आहे. 4 जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल आहे. त्यानंतरच बदल्या होणार, अशी स्थिती होती. मात्र, शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीचे वारे लगेच वाहू लागले आहेत. 10 जूनला शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील निवडणूक घेण्याचे आयोगाने 8 मे रोजी जाहीर केले होते. परंतु, निवडणूक उन्हाळी सुटीनंतर घ्या, अशी मागणी शिक्षकांनी केल्याने तूर्तास ही निवडणूक स्थगित करण्यात आली आहे.
या वर्षी 15 जून रोजी शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे. त्यानंतर 25 ते 30 जूनदरम्यान पुन्हा शिक्षक व पदवीधर निवडणुका होऊ शकतात, अशी शक्यता आहे. त्याची आचारसंहिता 25 मेच्या दरम्यान लागण्याची शक्यता आहे. तसे झाले तर बदल्यांची प्रक्रिया थेट जुलैमध्ये जाण्याची शक्यता आहे.
जिल्हा प्रशासनाने बदल्यांची तयारी करण्याच्या सूचना खातेप्रमुख व गटविकास अधिकाऱयांना दिल्या होत्या. 5 एप्रिल रोजी सामान्य प्रशासन विभागाने तसे पत्र काढले होते. 14 एप्रिल ते 31 मे या कालावधीत बदल्यांबाबतची सर्व पूर्वतयारी करायची आहे. यात कार्यालयप्रमुखांनी 15 ते 21 एप्रिलपर्यंत त्यांच्या स्तरावर संवर्गनिहाय कर्मचारी सेवाज्येष्ठता यादी तयारी करावी. तसेच त्यावर हरकती घेऊन ही यादी अंतिम करावी. 22 एप्रिलपासून 29 एप्रिलपर्यंत कर्मचाऱयांनी बदलीसाठी दिलेले विकल्प, विनंती अर्ज विहित कागदपत्रांसह खातेप्रमुखांकडे सादर करावे, 30 एप्रिल रोजी या विकल्प व अर्जांची छाननी करून माहिती अद्ययावत करावी व जिल्हास्तरावर संवर्गनिहाय खातेप्रमुखांकडे माहिती सादर करावी, असे या पत्रात म्हटले होते. त्यानुसार बदलीपात्र कर्मचाऱयांच्या सेवाज्येष्ठता याद्या व इतर तयारी प्रशासनाने केली आहे.
बदल्यांबाबत शिक्षकांमध्ये संभ्रम
z शिक्षक बदली धोरणानुसार शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या आधीच शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया उरकणे अपेक्षित आहे. 15 जूनला शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे. परंतु, आचारसंहितेमुळे त्याआधी शिक्षकांची बदल्यांची प्रक्रिया होणे शक्य नाही. त्यामुळे यंदा बदल्या होणारी की नाही, याबाबतही शिक्षकांमध्ये संभ्रम आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जूनअखेर होण्याची शक्यता आहे. लोकसभेची आचारसंहिता संपली की, शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची आचारसंहिता लागेल. त्यामुळे यंदा शिक्षकांच्या बदल्यांबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List