कोपरगावातील वीज आठ तास बंद; उकाड्याने नागरिक त्रस्त, महावितरणवर संताप
दरवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी विद्युत तारांना स्पर्श करणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडल्या जातात. त्यासाठी शनिवारी कोपरगाव शहर व तालुक्यातील 132 वीज उपकेंद्राअंतर्गत येणाऱ्या सर्व गावातील वीज पुरवठा बंद करण्यात आला. याकरिता महावितरणच्या कोपरगाव येथील कार्यालयाकडून सकाळी 10 ते दुपारी 5 या वेळेत वीज पुरवठा बंद ठेवण्याची परवानगी देण्यात आली होती.
राज्यात उष्णतेचा पारा 40 अशांवर गेला आहे. त्यातच शनिवारी कोपरगाव शहरासह तालुक्यातील वीज पुरवठा तब्बल 8 तास बंद होता. त्यामुळे नागरिक उकाड्याने त्रस्त झाले. या प्रकारामुळे महावितरणचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. ऐन उन्हाळ्यात दुपारच्या वेळी वीज पुरवठा बंद ठेवण्यात आल्याने महावितरण विरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
झाडाच्या फांद्या तोडण्याकरता टप्प्याटप्प्याने भागानुसार वीज बंद करता आला असता. मात्र, झाडाच्या फांद्या तोडण्याबरोबरच 132 वीज उपकेंद्राने दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने सकाळी 10 ते दुपारी 5 या वेळेत वीज पुरवठा बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे परिणामी वृद्ध नागरिक व लहान मुलांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या बाबीची दखल घेऊन जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांनी केली आहे.
वीज पुरवठा बंद ठेवण्याबाबत पूर्वसूचना देण्यात आली नाही. यापूर्वी कोणत्याही ठिकाणची वीज दुरूस्तीची कामे किंवा झाडाच्या फांद्या तोडण्यासाठीच्या कामादरम्यान किती तास व कोणत्या भागातील वीज पुरवठा खंडित राहणार आहे, याबाबतची पूर्वसूचना प्रसार माध्यमातून दिली जात होती. मात्र महावितरणच्या वतीने अशी कुठलीही पूर्वसूचना कोपरगाव तालुक्यातील नागरिकांना, शासकीय व निमशासकीय कार्यालयांना देण्यात आली नाही. त्यामुळे कोपरगाववासीयांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List