चंद्राबाबूंच्या दौऱयाने कोल्हापूरकरांना मनस्ताप
करवीरनिवासिनी श्री अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी सरकारी लवाजमा घेऊन दाखल झालेले आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यामुळे आज शहरात वाहतुकीचा अक्षरशः बोजवारा उडाला. शहरातील रस्त्यांवर प्रचंड वाहतूककोंडी झाल्यामुळे भरउन्हात नागरिकांना थांबवून ठेवल्याने ठिकठिकाणी कोल्हापूरकरांनी वाहनांचे हॉर्न वाजवून आपला संताप व्यक्त केला. एकंदरीत चंद्रबाबूंच्या दौऱयाने कोल्हापूरकरांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.
सरकारी लवाजमा घेऊन देवदर्शनाला येणाऱया अशा नेत्यांच्या सुविधा काढून घ्याव्यात. महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्री विनासुरक्षा सर्वत्र फिरत असताना महाराष्ट्राबाहेरील मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री यांचे कोल्हापुरातील नागरिकांना वेठीस धरणारे दौरे त्रासदायक ठरत असल्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
चंद्राबाबू नायडू हे आज कोल्हापूर दौऱयावर येण्यापूर्वी काल सायंकाळी पोलिसांकडून रंगीत तालीम घेण्यात आली. तर, आज सकाळी सव्वाअकराच्या सुमारास प्रत्यक्ष चंद्राबाबू नायडू दाखल झाल्यानंतर विमानतळ ते श्री अंबाबाई मंदिर मार्गावरील वाहतूक पूर्णतः थांबविण्यात आली. मंदिरातील दर्शन भाविकांसाठी बंद करण्यात आले होते. देवीचे दर्शन घेऊन जातानाही पुन्हा भरउन्हात नागरिकांना 15 ते 20 मिनिटे थांबविण्यात आल्याने वाहनधारकांनीही वाहनांचे हॉर्न वाजवून ठिकठिकाणी आपला संताप व्यक्त केला. यावेळी पोलीसही हतबल झाल्याचे दिसून आले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List