चोरट्यांनी उडविली ग्रामस्थांची दुपारची झोप; बिबट्याच्या धास्तीमुळे रात्रभर जागरण, आता भरदिवसाही चोरट्यांची भीती
भिगवण जिल्ह्यात ग्रामीण भागात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच आहे. बिबट्याची धास्ती आणि चोरट्यांचा धुमाकूळ यामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी ग्रामस्थांचे ‘जागते रहो’ सुरू आहे. मात्र, आता भरदिवसा होणाऱ्या चोऱ्यांमुळे दुपारची सुखाची झोपही उडाली आहे. भिगवणमधून एका घरातून चोरट्यांनी भरदिवसा सुमारे साडेपाच लाखांचा ऐवज लंपास केला. भरदिवसा झालेल्या या चोरीमुळे सर्वत्र घबराट पसरली.
जिल्ह्यात लोकसंख्येच्या तुलनेत ग्रामीण पोलिसांची संख्या अत्यंत अपुरी आहे. त्यामुळे गुन्हा घडल्यानंतर घटनास्थळी पोहोचण्यासाठी पोलिसांची अक्षरशः दमछाक होते. बंद घरे, बंगले हेरून चोरटे भरदिवसा कडी-कोयंडा, कुलुपे तोडून रोख रक्कम आणि सोन्या चांदीचे दागिने लुटून नेतात.
भिगवणमधील घरातून भरदिवसा साडेपाच लाखांचा ऐवज लंपास
इंदापूर तालुक्यातील शेटफळगडे येथील जगताप वस्ती येथील एका घरावर दिवसाढवळ्या दरोडा टाकत सुमारे साडेपाच लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. भरदिवसा होणाऱ्या चोऱ्यांमुळे सर्वत्र घबराट पसरली आहे.
भाग्यश्री अक्षय जगताप (रा. जगताप वस्ती, शेटफळगडे, ता. इंदापूर, जि. पुणे) यांनी यासंदर्भात भिगवण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. भाग्यश्री या काल सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास धान्य वाळवण्यासाठी गच्चीवर गेल्या होत्या. त्यावेळी घराचा दरवाजा उघडाच होता. ही संधी साधून चोरटे घरात घुसले. भाग्यश्री खाली आल्यानंतर त्यांना चोरटे दिसले. त्यांनी आरडाओरडा केल्यामुळे चोरटे पसार झाले. दोन्ही चोरांची रेखाचित्र तयार करून पोलिसांनी ती प्रसिद्ध केली आहेत.
चोरट्यांबाबत काही माहिती मिळाल्यास तत्काळ भिगवण पोलीस स्टेशन येथे (02118,246233) किंवा रुपेश कदम (9422977126) या नंबरवर संपर्क साधावा. विनोद महांगडे, सहायक पोलीस निरीक्षक, भिगवण
बारामतीत कपड्याचे दुकान फोडले
कोऱ्हाळे बुद्रूक येथे बारामती-नीरा रस्त्यालगत असलेल्या एका कापड दुकानाच्या मागील बाजूचा पत्रा कापून चोरट्यांनी सुमारे 63 हजार रुपयांचे कपडे चोरून नेले. कोऱ्हाळे बसस्थानक व परिसरात असलेल्या गाळ्यांमध्ये सातत्याने चोऱ्या होत असून, यामुळे छोटे व्यावसायिक हैराण झाले आहेत.
शरद गंगाधर कांबळे (रा. कांबळेवस्ती, कोहाळे बुद्रुक) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. कांबळे यांनी बारामती-नीरा रस्त्यालगत पत्र्यांच्या गाळ्यामध्ये अर्पिता कलेक्शन या नावाने कापड दुकान सुरू केले आहे. दि. 12 रोजी त्यांनी रात्री हिशेब करत 6240 रुपयांची रक्कम काऊंटरच्या ड्रॉव्हरमध्ये ठेवली होती. दुकान बंद करून ते घरी गेले. दि. 13 रोजी सकाळी त्यांना शेजारील दुकानदाराने तुमच्या दुकानातील साहित्य बाहेरील बाजूला अस्ताव्यस्त पडले असल्याचे कळविले. कांबळे यांनी दुकानात धाव घेतली. दुकानाच्या पाठीमागील बाजूला कपड्यांचे रिकामे बॉक्स पडलेले त्यांना आढळले.
पत्रा उचकटून चोरटे दुकानात घुसले. दुकानात ठेवलेल्या रकमेसह लहान मुले- मुलींचे कपडे आणि 64 साड्या चोरून ते पसार झाले.
कोहाळे बुद्रूक येथे नीरा-बारामती रस्त्यावर अनेक छोटे व्यावसायिक आपला व्यवसाय करतात. हॉटेल, मोबाईल, कापड दुकानांसह स्टेशनरी, मेडिकल, इलेक्ट्रॉनिक्स आदी दुकाने येथे आहेत. परंतु, या परिसरात सातत्याने चोऱ्या होत आहेत. त्यामुळे छोटे व्यावसायिक चोऱ्यांनी हैराण झाले असून, त्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List