झिरवाळ पोहचले महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या बैठकीला
दिंडोरीचे महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांचा जोरदार प्रचार सुरू असून पुढील रणनीतीसाठी आज महाविकास आघाडीच्या एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या बैठकीत अजित पवार गटाचे आमदार नरहरी झिरवाळ यांनी उघड हजेरी लावल्यामुळे खळबळ उडाली आहे.
दिंडोरी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून भास्कर भगरे तर भाजपच्या डॉ. भारती पवार यांच्यात थेट लढत होणार आहे. भगरे यांचा जोरदार प्रचार सुरू असून त्यांना लोकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, आज महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आयोजित केलेल्या बैठकीत अजित पवार गटाचे नरहरी झिरवाळ उपस्थित होते. झिरवाळ हे महाविकास आघाडीच्या बैठकीला का उपस्थित होते, याबाबतचे गूढ वाढले आहे.
झिरवाळांच्या नाराजीची चर्चा
दिंडोरी तालुक्यातील तिसगावमधील महाविकास आघाडीच्या बैठकीत दिंडोरी महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांच्याबरोबर नरहरी झिरवाळ गप्पा मारताना दिसले. दिंडोरीची जागा भाजपकडे गेल्याने झिरवाळ नाराजी असल्याची चर्चा आहे. झिरवाळ हे अजित पवारांची साथ सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये दाखल होणार असल्याचेही बोलले जात आहे.
भुजबळांची सारवासारव
नरहरी झिरवाळ यांच्या या अचानक भेटीबद्दल अजित पवार गटाचे छगन भुजबळ यांनी सारवासारव केली आहे. ते म्हणाले, भेटीबद्दल मला काही माहिती नाही. असे काही मला वाटत नाही. भगरे आणि झिरवाळ दिंडोरीतील आहेत. त्यांची चांगली ओळख आहे. यात वेगळा अर्थ काढण्याचे काही कारण नाही. माझ्याकडे वेगवेगळ्या पक्षांतील लोक येतात. शांतीगिरी महाराजदेखील मला भेटून गेले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List