राज्यात महाविकास आघाडीला 35 जागा मिळतील; शरद पवार यांनी व्यक्त केला विश्वास
Lok Sabha Election 2024: लोकसभेच्या पहिल्या तीन टप्प्यातील मतदान पंतप्रधान मोदींना अस्वस्थ करणारं आहे. लोक त्यांच्यापासून दूर जात आहेत. याची जाणीव भाजपला झाली आहे. राज्यात महाविकास आघाडीला 30 ते 35 जागा मिळतील असा विश्वास राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. सरसकट पक्ष कॉँग्रेसमध्ये विलीन होणार नाहीत. राष्ट्रवादी पक्ष कॉँग्रेसमध्ये विलीन करण्याचे मी बोललेलो नाही, असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.
निवडणुकीचे पहिले दोन टप्पे संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या प्रचार सभेतील स्वर बदलला आहे. त्यांनी आता उघडपणे मुस्लीम समाजाला विरोध केला. त्यांना आता लक्षात आले की, धर्मांध विचार घेऊनच आपल्याला मदत होऊ शकते, एवढंच नाही, जसजसे निवडणुकीचे टप्पे पुढे जातील तसे त्यांचे स्थान हे अधिकच संकटात जाईल, असे शरद पवार पत्रकार परिषदेत म्हणाले.
राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांची 17 मे रोजी मुंबईत एकत्र सभा होत आहे. यातून स्पष्ट होते की, मोदींना कोणाची ना कोणाची मदत हवी. त्यामधून त्यांचा आत्मविश्वास दिसून येतो, असा टोला शरद पवार यांनी लगावला.
आतापर्यंत अदानी-अंबानी कुणाचे दोस्त आहेत म्हणून देशात चर्चा होती? आता एकदम उलट ज्यांच्याबद्दल तक्रार होती, चर्चा होती, तेच कॉँग्रेसवर घसरायला लागले आहेत, असे शरद पवार म्हणाले.
एकत्र काम करण्याची आवश्यकता
उद्धव ठाकरे यांच्या पक्षाबाबत मी काहीही बोललेलो नाही. शिवसेना ही स्वतंत्र संघटना असून त्यांचे अस्तित्वही स्वतंत्र आहे. काँग्रेस पक्षाच्या विचाराच्या जवळ जाणारा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. दोन्ही पक्ष अनेक वर्षे मंत्रिमंडळात एकत्र होते. आम्ही अनेक निवडणुका एकत्र लढवल्या आहेत. आताही अनेक मतदारसंघांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकमेकांना सहकार्य करत आहे. विचारधारा एक असल्यावर एकत्र काम करण्याची आवश्यकता आहे, हे दोघांना स्पष्ट झाले आहे, असे शरद पवार म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List