फिर्याद, ‘एमपीआयडी’ रद्द करण्यास खंडपीठाचा नकार; भ्रष्टाचारी, संचालकांना चपराक
नगर अर्बन मल्टिस्टेट को-ऑप. बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी दोषी संचालकांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल फिर्याद रद्द करावी तसेच ठेवीदार संरक्षण कायद्यांतर्गत (एमपीआयडी) कारवाई करू नये, या मागणीसाठी बँकेचे तत्कालीन चेअरमन राजेंद्र आगरवाल, नवनीत सुरपुरिया यांनी उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणीत दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने ठेवीदारांच्या बाजूने निकाल देत कोतवाली पोलीस ठाण्यात राजेंद्र गांधी यांनी दिलेली फिर्याद व एमपीआयडी कायदा लागू राहणार, असे स्पष्ट केले आहे.
न्यायालयाच्या निर्णयाचे राजेंद्र चोपडा यांनी स्वागत केले असून, सर्वसामान्य गोरगरीब ठेवीदारांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे म्हटले आहे. तसेच आता पोलिसांनी सखोल तपास करून दोषी अधिकारी, संबंधित संचालकांवर कारवाई करावी, अशी मागणीही चोपडा यांनी केली आहे.
राजेंद्र चोपडा म्हणाले, नगर अर्बन बँकेतील घोटाळय़ाप्रकरणी बँक बचाव कृती समिती तसेच जागृत सभासद सातत्याने कायदेशीर मार्गाने पाठपुरावा करीत आहेत. आज न्यायालयाने दिलेला निकाल महत्त्वपूर्ण आणि ठेवीदारांसाठी दिलासादायक आहे. बँकेत स्पष्टपणे प्रचंड मोठा गैरव्यवहार तत्कालीन चेअरमन दिवंगत दिलीप गांधी व त्यांच्या सहकारी संचालकांनी केला. यात काही भ्रष्ट अधिकाऱयांनीही त्यांना साथ दिली. असे असताना गुन्हाच रद्द होण्यासाठी न्यायालयात धाव घेणेच चुकीचे होते. आता न्यायालयाने त्यांना चपराक मारली आहे. बँकेचा बँकिंग परवाना आधीच रद्द झाला आहे. अशा परिस्थितीत आता दोषी अधिकारी, संचालकांवर कायद्याने कारवाई अटळ आहे. तसेच अमित पंडित याच्या एकटय़ाकडे 35 ते 40 कोटींची थकबाकी आहे. तसेच 5 कोटींहून थकबाकी असलेले पन्नासपेक्षा जास्त कर्जदार आहेत. त्यांच्याकडील वसुलीसाठी पोलिसांनी धडक मोहीम हाती घेण्याची गरज आहे. बँकेचे अवसायक गणेश गायकवाड हे वसुलीसाठी प्रामाणिकपणे काम करीत आहेत.
तत्कालीन तपासी अधिकारी संदीप मिटके यांनी या प्रकरणाचा तपास करून अनेक आरोपींना अटक केली आहे. दिवंगत खासदार दिलीप गांधी यांनी संचालक व आपल्या परिवारासह बँकेला लुटण्याचे काम केले. सरोज दिलीप गांधी यांनी नगर मर्चंट्स को- ऑप. बँकेकडूनही कर्ज घेतले होते. ते वसूल करण्यासाठी बँकेला अनेक पत्रे दिली. गांधी यांच्या बंगल्यावर बँकेचे नाव लावून कर्ज वसुली करावी, अशी मागणी केली. परंतु, मर्चंट्स बँकेच्या संचालक मंडळाने तेव्हा खासदार असलेल्या दिलीप गांधी यांना विशेष सवलत देत वनटाईम सेटलमेंट केली व अतिशय कमी पैसे घेऊन बँकेचे नुकसान केले आहे. यामुळे दिवंगत दिलीप गांधी यांचे धाडस वाढत गेले व अर्बन बँकेत त्यांनी प्रचंड गैरकारभार केला, असे राजेंद्र चोपडा यांनी सांगितले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List