पाच वर्षांत पाच पंतप्रधान, हा जावईशोध कुठून लावला; शरद पवारांचा मोदींना बोचरा सवाल
इंडिया आघाडीत पंतप्रधान पदावर अद्याप कोणतीही चर्चा झाली नाही. तरीही नरेंद्र मोदी यांनी विरोधकांचे 5 वर्षांत पाच पंतप्रधान होतील, असा जावईशोध कुठून लावला माहीत नाही, असा टोला राष्ट्रवादी कॉँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी गुरुवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी पवार म्हणाले, इंडिया आघाडीला आज पंतप्रधान कोण, याबाबत चिंता करण्याची गरज नाही. लोकसभा निवडणुकीनंतर आम्हाला बहुमत मिळाले तर सर्वानुमते पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरवला जाईल. त्याला संपूर्ण 5 वर्षं पाठिंबा दिला जाईल. पाच वर्षांत पाच पंतप्रधान ही कल्पना मोदींच्या डोक्यातून आल्याचे शरद पवार म्हणाले.
एवढं असत्य बोलणारा पंतप्रधान मी कधी पाहिलेला नाही
पंतप्रधान मोदी भाषणात खोटय़ा गोष्टी सांगतात. त्यांच्याकडे लोकांचे समाधान करण्याची खात्री दिसत नाही. त्यामुळे मूळ मुद्दे बाजूला ठेवून लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवायचा प्रयत्न मोदींकडून केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाकडे लोक फारसं लक्ष देत नाहीत. एवढं अवास्तवात आणि असत्य बोलणारा पंतप्रधान मी कधी पाहिलेला नाही, असे शरद पवार म्हणाले.
महाराष्ट्रातील चित्र बदलेल
इंडिया आघाडीला मोठा पाठिंबा मिळत आहे. शेतकरी वर्ग मोदी सरकारवर नाराज आहे. तरुणांचा मोदी सरकारवर जो विश्वास होता तोही आता कमी झाला आहे. आमच्या दौऱ्यात तरुण मोठय़ा संख्येने सहभागी होत आहेत. महाराष्ट्रात निश्चितच चित्र बदलेल, असा आम्हाला विश्वास आहे, असे शरद पवार म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List