आकुर्डीतील महिला शास्त्रज्ञाकडून दुर्मिळ कीटकाच्या प्रजातीचा शोध; शवविच्छेदनात अचूकता आणण्यासाठी मदत करू शकणार
आकुर्डीतील शास्त्रज्ञ डॉ. अपर्णा कलावटे यांना दुर्मिळ कीटकाच्या (बीटलच्या) प्रजातीचा शोध लावण्यात यश आले आहे. नवीन प्रजातीचे कीटक फॉरेन्सिक सायन्ससाठी महत्त्वाचे ठरणार असून, ते शवविच्छेदनात अचूकता आणण्यासाठी मदत करू शकतात. पुणे जिल्ह्यातील मोरगाव येथे ही प्रजाती सापडल्याने याला ओमोर्गस (अॅफ्रोमोर्गस) मोरेश्वर कलावटे आणि स्ट्रम्फर, २०२४ असे नाव देण्यात आले आहे.
आकुर्डी येथील भारतीय प्राणी सर्वेक्षण, पश्चिमी प्रादेशिक केंद्रात कार्यरत असणाऱ्या डॉ. अपर्णा कलावटे यांनी हा शोध लावला आहे. याबाबतचा अपर्णा यांनी सादर केलेला शोधप्रबंध नुकताच ‘झुटेक्सा’ या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. दक्षिण आफ्रिका येथील डिट्सॉन्ग नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्रीचे संचालक वर्नर पी स्टूम्फर यांनी या पेपरचे सह-लेखन केले होते. नव्याने सापडलेला कीटक ट्रोगिडे कुळातील आहे. एखाद्या जीवाच्या मृत्यूनंतर, शरीराच्या विघटनादरम्यान, ब्लोफ्लाइज हे पहिल्या टप्प्यात येतात आणि त्यानंतर मोठ्या संख्येने अळ्या खाणारे विविध शिकारी कीटक येतात. सामान्यपणे मृत शरीरावर विघटनाच्या अंतिम टप्प्यात आढळून येणारे हे कीटक जळालेल्या मृतदेहांवर मात्र इतर कीटकांच्या तुलनेत पहिल्यांदा आढळून येतात. पोस्टमार्टममध्ये अचूकता आणण्यासाठी त्याची मदत होते. ओमोर्गस या कीटकाच्या (बीटलच्या) जातीची उपजाती असणाऱ्या अॅफ्रोमोरगसमध्ये एकूण नऊ – प्रजाती आहेत. या नवीन प्रजातीच्या समावेशासह हिंदुस्थानातील या उपजातीची संख्या दहावर पोहोचली आहे. या गटातील कीटकांना काहीवेळा हाईड बीटल म्हणतात कारण ते त्यांचे शरीर मातीखाली झाकून लपतात. ते सहसा काळे किंवा राखाडी असतात. कीटकाच्या या प्रजातीविषयी अत्यंत कमी माहिती उपलब्ध आहे, असे डॉ. अपर्णा कलावटे यांनी सांगितले.
डॉ. कलावटे गेल्या १५ वर्षांपासून कीटकांच्या विविध प्रजातींचा अभ्यास करत आहेत. जगाच्या इतर भागाच्या तुलनेत हिंदुस्थानात केराटिन बीटलच कमी अभ्यास झालेला आहे. आतापर्यंत केवळ परदेशी शास्त्रज्ञच भारतीय ट्रॉजीड जीवजंतूंवर अभ्यास करत होते. मात्र, या कीटकाच्या शोधामुळे ‘ट्रॉगिड बीटल’वर काम करणाऱ्या शास्त्रज्ञांमध्ये डॉ. अपर्णा यांचा समावेश झाला आहे. त्यांनी दोन नवीन प्रजातींचा अभ्यास केला आहे.
हे लहान कीटक मृत जीवांचे शव खाऊन पर्यावरणाची स्वच्छता करण्यात मानवजातीला मदत करीत आहेत. तसेच, जीवाच्या मृत्यूच्या वेळेचा अभ्यास करताना फॉरेन्सिक सायन्ससाठीही हे कीटक महत्त्वाचे ठरणार आहेत. या कीटकांच्या संवर्धनासाठी आपण सर्वसामान्यांना त्याचे महत्त्व आणि स्वरूप याविषयी जागरूक करणे आवश्यक आहे. देशात या कमी अभ्यासलेल्या गटातील अधिक प्रजातींचे दस्ताऐवजीकरण करणे हे माझे उद्दिष्ट आहे. अजून अनेक प्रजातींचा शोध घेणे सुरू आहे.
डॉ. अपर्णा कलावटे (शास्त्रज्ञ)
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List