श्री अंबाबाई मूर्तीचे घाईत संवर्धन करु नका, अयोग्य संवर्धन झाल्यास अधिकारी जबाबदार; ‘प्रजासत्ताक’ संस्थेचा इशारा

श्री अंबाबाई मूर्तीचे घाईत संवर्धन करु नका, अयोग्य संवर्धन झाल्यास अधिकारी जबाबदार; ‘प्रजासत्ताक’ संस्थेचा इशारा

करवीरनिवासिनी श्री अंबाबाई देवीच्या मूळ मूर्तीचे उद्या (14 रोजी) आणि सोमवारी (15 रोजी) पुन्हा एकदा भारतीय पुरातत्व विभागाच्या वतीने संवर्धन करण्यात येत आहे. मागील संवर्धनावेळी देवीच्या मूळ स्वरूपात बदल करण्याचा प्रयत्न झाल्याची गंभीर बाब समोर आली होती. त्यामुळे आता पूर्वीप्रमाणे देवीच्या मस्तकावरील नाग प्रतिमेसह उचित व अद्ययावत तंत्राद्वारे योग्य पदार्थांचा वापर करून जास्त काळ टिकणारे संवर्धन करावे, अशी मागणी भक्तांच्या वतीने प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे दिलीप देसाई यांनी केली आहे. दरम्यान, अयोग्य संवर्धन करून भक्तांच्या धार्मिक भावना दुखावल्यास त्यास संबंधित अधिकाऱयांना जबाबदार धरण्यात येईल, असा इशाराही पत्रकाद्वारे दिला आहे.

जिल्हाधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल येडगे, तसेच प्रशासकीय अधिकाऱयांना ई-मेल करून दिलीप देसाई यांनी इशारा दिला आहे.

करवीरनिवासिनी श्री अंबाबाई देवीच्या मूर्तीची झालेली झीज रोखण्यासाठी सन 2015 आणि 2021मध्ये मूर्तीचे संवर्धन करण्यात आले. या संवर्धनावेळी देवीच्या मस्तकावरील नाग नाहीसा झाल्यासह अनेक अनुचित बाबी निदर्शनास आल्या. तसेच काही बाबी आणि चुका गेल्या वेळी संवर्धन करताना झाल्याचे सादर झालेल्या अहवालावरून दिसून येते. गेल्या वेळी संवर्धनासाठी वापरलेले पदार्थ हे मूळ मूर्तीच्या पाषाणाशी न जुळल्यामुळे अनेक ठिकाणी तडे गेल्याचे अहवालात नमूद केले आहे. पुरातत्व विभागाचे व्ही. आर. मंगीराज आणि आर. एस. त्रंबके यांनी जानेवारी 2024मध्ये दिलेल्या अहवालात ही बाब निदर्शनास आणून देत पुन्हा तातडीने संवर्धन करण्याची सूचना दिली होती.

त्यामुळे उद्या आणि परवा होणारे संवर्धन हे योग्य पदार्थांचा वापर करून होणे आवश्यक आहे. श्री अंबाबाई देवी लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असून, साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आहे. अशा देवतांच्या मूर्तीचे संवर्धन केवळ दोन दिवसांत होणार आहे, ही बाब आश्चर्यचकित करणारी आहे. संवर्धनप्रक्रिया इतकी साधी असेल, तर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने ती राबविण्यात विलंब का केला? असा प्रश्नही देसाई यांनी उपस्थित केला आहे.

करवीरनिवासिनी श्री अंबाबाई देवीच्या मूर्तीचे मूळ स्वरूपात मस्तकावरील नाग प्रतिमेसह संवर्धन झाले पाहिजे. पदाचा दुरुपयोग करून घाईगडबडीत आणि अयोग्य पद्धतीने संवर्धनाचे काम होऊ नये. तसे घडल्यास आणि भक्तांच्या धार्मिक भावना दुखावल्यास त्यास संबंधित अधिकारी यांना जबाबदार धरण्यात येईल, असा इशाराही पत्रकाद्वारे दिला आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;