शिंदेंची पुन्हा दिल्लीतील आकांकडे धाव, करावे तसे भरावे… मिंधेंना एकाकी पाडले… पक्षातही कुरबुरी सुरू; मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार नाट्यांनंतर महाराष्ट्रात राजकीय घडमोडींना वेग
शिंदे गटाच्या मंत्र्यांनी मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीवर टाकलेल्या बहिष्कारानंतर महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिंदे गटाशी वाजल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी स्वतंत्र खलबते सुरू केली आहेत. त्यातच शिंदे गटात अंतर्गत कुरबुरी वाढल्या आहेत. त्यामुळे मिंधे एकाकी पडले असून मदतीसाठी त्यांनी आज अमावास्येच्या मुहूर्तावर दिल्लीतील आकांकडे धाव घेतली. ‘करावे तसे भरावे’ अशी प्रतिक्रिया यावर राजकीय वर्तुळात उमटली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने फोडाफोडी सुरू केली आहे. त्याचा सर्वात मोठा फटका शिंदे गटाला बसला आहे. भाजपने शिंदे गटाचे मंत्री आणि आमदारांच्या मतदारसंघातील आजी माजी नगरसेवक व पदाधिकारी गळाला लावले आहेत. त्या नाराजीतून शिंदे गटाच्या मंत्र्यांनी मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी आपल्या मंत्र्यांसह मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेऊन नाराजी व्यक्त केली. मात्र फडणवीसांनी मिंधेंच्या मंत्र्यांनाच मर्यादा पाळण्याचा सल्ला दिला. त्यामुळे शिंदे नाराज झाल्याचे समजते. विशेषतः श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण-डोंबिवली मतदारसंघात भाजपने केलेली फोडाफोडी व चालवलेला हस्तक्षेप शिंदेंच्या जिव्हारी लागला आहे.
याच नाराजीतून शिंदेंनी मुंबईत पोलीस विभागाच्या कार्यक्रमाला दांडी मारली. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची नावे होती, मात्र कार्यक्रमाला केवळ फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहिले. त्याऐवजी त्यांनी थेट दिल्ली गाठली. दिल्लीत त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली.
मिंधेंचे मंत्री म्हणाले, थोडीशी नाराजी!
शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी या नाराजीनाटय़ावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. ‘कुटुंबात वादविवाद होत राहतात. आम्ही आमच्या भावना मुख्यमंत्र्यांकडे मांडल्या आहेत. निवडणुकांच्या काळात पक्षप्रवेश होत असतात. त्यातून थोडीशी नाराजी होती. त्याबाबत चर्चा झाली आहे. यापुढे महायुतीतील पक्ष एकमेकांचे पदाधिकारी फोडणार नाहीत असे ठरल्याचे सरनाईक यांनी सांगितले.
शिंदेंना गट फुटण्याची भीती – सपकाळ
महायुतीमध्ये एकनाथ शिंदे आता एकटे पडले आहेत आणि पक्ष फुटेल काय याची चिंता त्यांना सतावू लागली आहे. याच भीतीतून नाराजी व निषेध नाटय़ सुरू झाले आहे, असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी हाणला. ‘ही महायुती विचारासाठी, विकासासाठी किंवा विश्वासातून झालेलीच नाही तर केवळ सत्तेसाठी झालेली आहे. शिंदेंनी सत्तेसाठी लाचार होण्यापेक्षा बाहेर पडावे, असा खोचक सल्लाही त्यांनी दिला.
क्रमांक एक हेच आमचे उद्दिष्ट
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रातील क्रमांक एकचा पक्ष बनविण्याचे आमचे उद्दिष्ट असल्याचे एका भाजप नेत्याने खासगीत सांगितले. बिहारनंतर भाजप अधिक मजबूत झाली आहे, अशी पुस्तीही या नेत्याने जोडली.
भाजपकडून शिंदेंना संकेत दिले जातायत!
‘फडणवीसांना शिंदेंबद्दल अजिबात आदर वगैरे नाही. त्यांच्या मंत्र्यांनाही शिंदेंबद्दल फारसा आदर नाही. भाजपला शिंदे नकोसे झाले आहेत. तसे संकेत वारंवार दिले जात आहेत. शिंदेंना आत्मसन्मान असेल तर त्यांनी हे संकेत समजून तत्काळ युतीतून बाहेर पडायला हवे. वेळीच निर्णय न घेतल्यास त्यांना लवकरच दरवाजा दाखवला जाईल,’ अशी टीका शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवत्ते क्लाइड व्रॅस्टो यांनी केली.
आकाने खडसावले
शिंदेंची अमित शहा यांच्याशी 50 मिनिटे चर्चा झाली. त्यांनी रवींद्र चव्हाण यांच्याबद्दल शहांकडे तक्रार केल्याचे समजते. चव्हाण हे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून फोडाफोडी सुरू आहे. त्यासाठी पैशांचा वारेमाप वापर केला जात आहे. माझा गट व माझे लोकप्रतिनिधी यांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात आहे. माझे खच्चीकरण केले जात आहे. मला व माझ्या पक्षाला वाचवा, अशी विनंती शिंदेंनी शहांकडे केली असता ‘हेवेदावे राज्यातच सोडवा. तुमच्या सहकाऱयांना आवरा, युतीधर्म पाळा,’ अशा शब्दांत शहांनी खडसावल्याचे कळते.
भाऊ-दादा यांच्यात खलबतं
शिंदे दिल्लीला गेल्याचं कळताच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची वर्षा निवासस्थानी बैठक झाली. शिंदे आणि त्यांच्या मंत्र्यांची नाराजी दूर कशी करायची? शिंदेंची नाराजी कायम राहिली तर पुढं काय करायचं याविषयी दोघांमध्ये चर्चा झाल्याचे समजते. महायुतीमध्ये शिंदेंची ठरवून काsंडी करण्याचा हा डाव तर नाही ना, अशीही चर्चा आता सुरू झाली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List