अबब! वरळीत म्हाडाचा 85 मजली टॉवर, विमानतळ प्राधिकरणाची परवानगी
<< मंगेश दराडे >>
वरळी बीडीडी चाळीतील रहिवाशांसाठी पुनर्वसन इमारतींचे काम सुरू असताना दुसरीकडे म्हाडाने लॉटरीच्या माध्यमातून घरांच्या विक्रीसाठी येथे पाच गगनचुंबी टॉवर उभारण्याची तयारी सुरू केली आहे. यातील दोन टॉवर 58 मजली, तर तीन टॉवर 85 मजली असणार आहेत. यासाठी म्हाडाला विमानतळ प्राधिकरणाची परवानगी मिळाली असून पर्यावरण विभागाची मंजुरी मिळताच टॉवर उभारणीच्या कामाला सुरुवात होईल.
म्हाडाच्या माध्यमातून वरळी, नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग या बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचे काम दोन टप्प्यांत पूर्ण केले जाणार आहे. वरळीतील 121 चाळींमधील 9689 रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी 40 मजली 34 टॉवर उभारले जाणार आहेत. बीडीडी चाळीतील
रहिवाशांच्या पुनर्वसनातून विक्रीयोग्य घरे उभारण्यासाठी म्हाडालादेखील मोठय़ा प्रमाणात जागा उपलब्ध होणार आहेत. म्हाडाने येथे 5 विक्रीयोग्य टॉवर उभारण्याची तयारी सुरू केली आहे. त्यातील 2 टॉवर 58 मजली असून त्यात 1 बेसमेंट, 8 पोडियम, 1 ई डेक आणि 48 मजल्यांवर आलिशान फ्लॅट असणार आहेत. या टॉवरची उंची 192 मीटर असणार आहे. तसेच 3 टॉवर 85 मजली असणार असून यात 1 बेसमेंट, 8 मजले पोडियम आणि 76 मजल्यांवर आलिशान फ्लॅट असणार आहेत. या टॉवरची उंची 300 मीटर असणार आहे.
सी व्ह्यू स्विमिंग पूल, क्लब हाऊस
म्हाडाच्या या टॉवरमध्ये स्विमिंग पूल, जिम, क्लब हाऊस, स्पा, मिनी थिएटर, बाल्कनी अशा अनेक हायफाय सुविधा असणार आहेत. विशेष म्हणजे फ्लॅटला सी फेस ह्यू मिळेल अशा दृष्टीने इमारतीची रचना असणार आहे. इच्छुकांना जोडी फ्लॅट घेण्याचीदेखील सुविधा असेल. तसेच प्रत्येक फ्लॅटसाठी दोन स्वतंत्र पार्ंकग असणार आहेत.
लॉटरीसाठी 3333 घरे मिळणार
पाच टॉवरमध्ये मिळून म्हाडाला लॉटरीसाठी साधारण 3333 घरे मिळणार आहेत. उच्च उत्पन्न गटासाठीची 2 आणि 3 बीएचकेची ही घरे असून त्यांचे क्षेत्रफळ 1200 ते 1500 चौरस फूट असणार आहे. वरळी बीडीडीच्या जागेवरील या घरांच्या किमती सुमारे 8 ते 10 कोटींच्या घरात असतील. वरळीत प्रति चौरस फुटाचा दर सव्वा लाख रुपये आहे. म्हाडाच्या या घरांचा दर मात्र 60 ते 62 हजार प्रति चौरस फूट असेल. त्यामुळे या घरांची विक्री हातोहात होईल, असे एक अधिकाऱयाने सांगितले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List