महिलांना दहा हजार रुपयांचे वाटप झाले, त्याचा बिहारवर परिणाम – शरद पवार
महाराष्ट्राप्रमाणे बिहारच्या निवडणुकीआधी महिलांना प्रत्येकी दहा हजार रुपयांचे वाटप झाले. याचा परिणाम निकालावर झाल्याची स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मांडली. मतदानात महिलांचा 50 टक्के वाटा आहे. त्यामुळेच असा निकाल लागल्याचे ते म्हणाले, मात्र अशा पद्धतीने पैसे वाटणे अयोग्य आहे. निवडणुका पारदर्शक पद्धतीने होतात का याचा निवडणूक आयोगाने गांभीर्याने विचार करावा, असेही ते म्हणाले.
शरद पवार यांनी बारामतीमधील ‘गोविंदबाग’ निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, निवडणुकीआधी पैसे वाटण्याची ही पद्धत रूढ झाली तर लोकांचा निवडणूक पद्धतीवरच्या विश्वासालाच तडा बसेल. मतदान झाल्यावर मी काही लोकांशी बोललो होतो, त्यावेळी त्यांनी निवडणुकीत महिलांचे वाढलेले मतदान आणि त्यांना निवडणुकीआधी खात्यात दिलेल्या दहा हजार रुपयांबाबत सांगण्यात आले. विजेत्यांनीही निकालाच्या विजयाचे श्रेय महिलांना दिले आहे, असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातही या पद्धतीने निवडणुकीपूर्वी सरकारी खजिन्यातून पैसे वाटले. सरकारी खजिन्यातून एवढय़ा मोठय़ा प्रमाणात पैसे वाटप करणे योग्य आहे का, याचाही विचार होणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.
‘स्थानिक’चा अधिकार स्थानिक पदाधिकाऱ्यांना
राज्यात नगरपरिषद, नगरपंचायती निवडणुका होत आहेत. या स्थानिक निवडणुका आहेत. त्या कधीही आम्ही पक्ष म्हणून लढवल्या नाहीत. त्या-त्या जिह्यात पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा. हा त्यांचा अधिकार आहे, असे पवार म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List