अंगणात खेळणाऱ्या चिमुरड्याला बिबट्याने ओढून नेले; महिनाभरात शिरूरमध्ये तिसरी घटना, संतप्त ग्रामस्थांनी वन विभागाचे वाहन पेटवले
आम्ही घराच्या बाहेर जायचे का नाही? मुलांना अंगणात खेळू द्यायचे की नाही? हे संतप्त सवाल आहेत बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमूखी पडलेल्या शिरूर तालुक्यातील पालक आणि ग्रामस्थांचे. अंगणात खेळणाऱ्या तेरा वर्षाच्या मुलाला बिबट्याने भरदिवसा उसाच्या शेतात ओढून नेले. त्यामध्ये त्या चिमुरड्याचा मृत्यू झाला. बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडण्याची महिन्याभरातील ही तिसरी घटना आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी वनविभागाची गाडीच पेटवून दिली.
रोहन विलास ऊर्फ बाळू बोंबे (13) असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. पिंपरखेड दत्तवाडी येथे सायंकाळी पावणेचार वाजण्याच्या सुमारास रोहन अंगणात असताना जवळच्या शेतामध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला करून त्याला जवळच्या शेतात ओढत नेले. या वेळी शेतात काम करणाऱ्या नागरिकांनी आरडाओरडा केल्याने उसाच्या शेतात मुलाला सोडून बिबट्या पळाला. परंतु तोपर्यंत मुलाचा मृत्यू झाला होता. रोहनच्या मृत्युमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 12 ऑक्टोबरला पिंपरखेड येथे शिवन्या बॉम्बे या चिमुकलीचा, तर दहा दिवसात जांबु तेथील भागुबाई रंगनाथ जाधव या 70 वर्षीय वृद्ध महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. यानंतर संतप्त नागरिकांनी रस्ता रोको केला होता. त्यानंतर काही बिबटे जेरबंद झाले होते. परंतु आज पुन्हा हल्ला झाल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.
आजच्या घटनेनंतर ग्रामस्थ आक्रमक झाले असून राज्याचे पालकमंत्री आणि वनमंत्री येथे येत नाही तोपर्यंत मृतदेह घरासमोरच ठेवला जाणार आहे. बिबट्याला मारण्याची परवानगी द्यावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
वनमंत्री नाईक आहेत कुठे?
जुन्नर, आंबेगाव, पारनेर, शिरूर या तालुक्यांमध्ये दररोज बिबटय़ांचे हल्ले होत असून वनमंत्री गणेश नाईक हे पुणे जिह्यात एकदाही फिरकले नाहीत. प्रशासकीय पातळीवर बैठका होत आहेत. पालकमंत्री अजित पवार यांनी एक बैठक घेतली. मात्र वनमंत्री नाईक एकदाही आले नाहीत अथवा बिबट परवान क्षेत्रामध्ये त्यांनी भेट दिलेली नाही. त्यामुळे त्यांच्या विरोधात गावकऱ्यांचा तीव्र संताप व्यक्त होत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List