माऊलींच्या गजराने अलंकापुरी दुमदुमली, उत्पत्ति एकादशीनिमित्त इंद्रायणी काठ गर्दीने फुलला
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात कार्तिकी यात्रेअंतर्गत उत्पत्ति एकादशीसाठी सुमारे तीन लाखांहून अधिक वारकऱयांनी केलेल्या माऊलीच्या गजराने शनिवारी अलंकापुरी दुमदुमली. वारकऱ्यांच्या गर्दीने इंद्रायणी काठ फुलून गेला होता. या वर्षी माऊलींच्या पहाट पूजेचा मान दर्शनबारीतील ठाणे येथील वारकरी दाम्पत्यास मिळाला. आळंदी देवस्थानने या दाम्पत्याचा सत्कार केला.
ग्रामदिंडी प्रदक्षिणा, इंद्रायणी स्नान, टाळ, मृदंग, विणीचा त्रिनाद झाला. आळंदी मंदिरात पहाटे मंगलमय वातावरणात पूजा झाली. माऊली मंदिर, इंद्रायणी घाट येथे लक्षवेधी विद्युत रोषणाई, तसेच मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.
‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’च्या गजरात प्रदक्षिणा मार्गावर वारकरी भक्तिरसात चिंब झाले होते. माऊलींच्या जयघोषात राज्यातून आलेल्या दिंडय़ांची नगरप्रदक्षिणा झाली. इंद्रायणी घाटावर स्नानास वारकऱयांनी गर्दी केली होती. दरम्यान, खांद्यावर पताका, डोईवर तुळशी वृंदावन, मृदंग वादनात इंद्रायणी घाटावर वारकऱ्यांनी सांप्रदायिक खेळाचा आनंद लुटला. टाळ-मृदंगाच्या नादाने अवघी अलंकापुरी दुमदुमून गेली. माऊलींच्या गाभाऱयात पंचामृत अभिषेक झाला. आरती झाल्यानंतर परंपरेने मानकरी आणि पदाधिकारी यांना देवस्थानतर्फे प्रसाद वाटप झाले.
लाखो वारकऱयांनी माऊलींच्या समाधीचे दर्शन घेतले. पुणे जिल्हा सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन यांनी दर्शन घेऊन कार्तिकी यात्रेचा आढावा घेतला. यावेळी आळंदी देवस्थानतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.मारुती देवस्थानचे अध्यक्ष अप्पा महाराज पवार आणि विश्वस्त मंडळाने दर्शन व्यवस्थेचे नियोजन केले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List