सामना अग्रलेख – न्यूयॉर्कमध्ये ट्रम्पचा पराभव, तिथे ज्ञानेश कुमार नाहीत
जगभरात उजव्या, उग्र विचारांचा उदय होत असताना पुरोगामी समाजवादी विचारांच्या जोहरान ममदानी यांची न्यूयॉर्कच्या मेयरपदी झालेली निवड आशादायी आहे. अमेरिकन जनतेने ट्रम्प यांच्या हुकूमशाहीला दिलेले हे उत्तर आहे. निष्पक्ष निवडणुका झाल्याने ते साध्य झाले. न्यूयॉर्कमध्ये एखादे ज्ञानेश कुमार असते तर निकालाआधीच ट्रम्प यांच्या समर्थकांनी विजयाचा धिंगाणा घातला असता. न्यूयॉर्क उदार आहे, सहिष्णू आहे, लोकशाहीवादी आहे. न्यूयॉर्कच्या जनतेला सलाम!
जगाच्या पाठीवर कोठेही भारतीय वंशाच्या व्यक्तीचा सन्मान झाला की, जणू काही हे आपल्या विश्वगुरूंमुळेच घडले अशी आवई उठवली जाते. प्रे. ट्रम्प यांच्या निवडणुकीच्या प्रचारात स्वतः पंतप्रधान मोदी उतरले होते, पण न्यूयॉर्कच्या ‘मेयर’पदी अस्सल भारतीय वंशाचे जोहरान ममदानी विजयी झाले व त्यांच्यावर जगभरातून अभिनंदनाचा वर्षाव सुरू असताना पंतप्रधान मोदी व त्यांच्या लाखो, कोटय़वधी भक्तांची तोंडे काळवंडलेली दिसत आहेत. समाजवाद, लोकशाही मानणाऱ्या ममदानी यांच्या विजयाने स्वतः प्रे. डोनाल्ड ट्रम्पसुद्धा आडवे झाले आहेत. ट्रम्प यांनी ममदानी यांच्या पराभवासाठी सर्व हातखंडे वापरले, धमक्या दिल्या, पण ममदानी यांनी माघार घेतली नाही. हुकूमशहापुढे नांगी टाकणाऱ्यांना जग लक्षात ठेवत नाही. न्यूयॉर्क शहराच्या मेयरपदी ममदानी जिंकले. त्यांचे वय फक्त 34 आहे. न्यूयॉर्क शहरात जगभरातील लोक राहतात. या सर्व इमिग्रन्टस्ना अमेरिकेतून हाकलण्याच्या मोहिमेविरुद्ध जोहरान ममदानी उभे राहिले व ट्रम्प यांचे शस्त्र त्यांच्यावरच उलटवले. ममदानी यांनी झालेल्या एकूण मतदानापैकी 50.4 टक्के मते मिळवली. म्हणजे न्यूयॉर्कच्या अर्ध्यापेक्षा जास्त आणि सर्वच देशांच्या तसेच धर्माच्या नागरिकांनी त्यांना मतदान केले. न्यूयॉर्कमध्ये मुसलमान फक्त चार टक्के आहेत, हे येथे लक्षात घेतले पाहिजे. भारतात पंडित नेहरू व त्यांचा विचार उद्ध्वस्त केला जात आहे. काल रात्री काय घडले तरी त्याला नेहरूच जबाबदार असल्याची बोंब ठोकली जाते, पण ममदानी यांनी त्यांच्या पहिल्या विजयी भाषणात भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी स्वातंत्र्यानंतर केलेल्या पहिल्या भाषणाचा संदर्भ दिला. ममदानी म्हणाले, ‘‘तुमच्या समोर उभे राहिल्यानंतर मला जवाहरलाल नेहरू यांचे शब्द आठवतात, इतिहासात असा क्षण क्वचितच येतो जेव्हा आपण
जुन्याकडून नव्याकडे पाऊल
टाकतो. जेव्हा एका युगाचा अंत होतो आणि दीर्घकाळ दबावाखाली राहिलेल्या देशाचा आत्मा व्यक्त होतो. आज आपण जुन्याकडून नव्याकडे पाऊल टाकले आहे.’’ नेहरूंच्या विचारसरणीत मोदी व नेतान्याहूसारखे नेते बसत नाहीत. ममदानी यांनी हे उघडपणे सांगितले. ममदानींमध्ये हिंमत आहे. ट्रम्प हा व्यापारी माणूस असल्याचे त्यांनी ठणकावले, तेही न्यूयॉर्कच्या भूमीवरून. ट्रम्प यांना दणका देताना ममदानी गरजले, ‘‘आम्ही त्या भ्रष्टाचाराची संस्कृती संपवून टाकू, ज्यामुळे ट्रम्प यांच्यासारख्या अब्जोपतींना कर चुकवण्याची सवलत मिळत आहे.’’ ममदानी हा वाघाचा बच्चा निघाला. विजयी सभेत ते गरजले. ‘‘डोनाल्ड ट्रम्प, मला माहीत आहे, तुम्ही मला आता लाईव्ह पाहत आहात. थोडा आवाज मोठा करा. न्यूयॉर्कनेच तुम्हाला खांद्यावर घेतले आणि तेच न्यूयॉर्क तुम्हाला कायमचे घरी पाठवेल. आमचा विजय हा एका व्यक्तीचा विजय नाही, तर एक राजकीय विचारसरणीचा विजय आहे.’’ न्यूयॉर्क ही कुबेरांची, सावकारांची जागतिक राजधानी मानली जाते. या सगळय़ात श्रीमंत शहराची निवडणूक ममदानी यांनी ‘श्रीमंत विरुद्ध गरीब’ अशा वळणावर नेऊन ठेवली. त्यांनी न्यूयॉर्कमधील बुजुर्ग, लहान मुले, वाहतूक व्यवस्थेवर बोलायला सुरुवात केली. न्यूयॉर्क शहराच्या नागरी सुविधा, विकासाचे प्रश्न हा त्यांचा विषय. इथे बसून आपण त्यांना सल्ले देण्यात अर्थ नाही. या निवडणुकीकडे भारताने कोणत्या दृष्टीने पाहायला हवे, तर लोकशाही काय असते व तेथे निवडणूक प्रक्रिया किती पारदर्शकपणे राबवल्या जातात हे दिसले. प्रे. ट्रम्प यांनी ममदानी यांना धमक्या दिल्या म्हणजे न्यूयॉर्कच्या निवडणूक आयोगालाही दबावाखाली घेण्याचा प्रयत्न केलाच असणार. तेथे आपल्याप्रमाणे ज्ञानेश कुमार नव्हते हे महत्त्वाचे. मोदी व त्यांच्या लोकांनी
भारताचा विश्वासघात
केला त्याप्रमाणे प्रे. ट्रम्प यांनी देशाचा विश्वासघात केला. ट्रम्प यांचा पराभव कसा करायचा हे कुणी दाखवून दिले असेल तर ते याच शहराने. या हुकूमशहांमध्ये दहशत निर्माण करायची असेल तर सत्तेचे केंद्रीकरण करण्यासाठीचे जे जे म्हणून मार्ग आहेत ते तोडावे लागतील. ‘‘ट्रम्प यांना आपण कशा पद्धतीने थांबविले हे आपण दाखविले नसून त्यांच्या नंतर तसे कुणी येणार नाही अशी आपण काळजी घेतली पाहिजे.’’ हे ममदानींचे उद्गार भारतीयांसाठी प्रेरक आहेत. न्यूयॉर्कच्या निवडणुकीतदेखील ‘हिंदू-मुसलमान’ झाले. ते करणाऱ्या संघाच्या परदेशी शाखा होत्या. ममदानी यांच्या आई मीरा नायर या हिंदू, तर वडील हे स्थलांतरित मुसलमान आहेत. मीरा या प्रख्यात चित्रपट निर्मात्या. ‘सलाम बॉम्बे’, ‘सलाम न्यूयॉर्क’सारखे सिनेमे त्यांनी काढले. या दोघांचा मुलगा जोहरान ममदानी यांच्या विचारसरणीवर मुक्त समाज व्यवस्थेचा प्रभाव पडलेला दिसतो. अमेरिकेच्या अध्यक्षपदी बराक ओबामा या आफ्रिकेतील स्थलांतरित माणसाला सलग दोन वेळा निवडून दिले गेले, पण ममदानी यांना विरोध झाला. जो भारतीय समाज ओबामांच्या मागे उभा राहिला, तो ममदानींच्या मागे उभा राहिला नाही. ट्रम्प व इलॉन मस्क यांनी ममदानींच्या पराभवासाठी जोर लावला, पण त्यांची पैशांची ताकद जनतेच्या रेट्यापुढे कमी पडली. जगभरात उजव्या, उग्र विचारांचा उदय होत असताना पुरोगामी समाजवादी विचारांच्या जोहरान ममदानी यांची न्यूयॉर्कच्या मेयरपदी झालेली निवड आशादायी आहे. अमेरिकन जनतेने ट्रम्प यांच्या हुकूमशाहीला दिलेले हे उत्तर आहे. निष्पक्ष निवडणुका झाल्याने ते साध्य झाले. न्यूयॉर्कमध्ये एखादे ज्ञानेश कुमार असते तर निकालाआधीच ट्रम्प यांच्या समर्थकांनी विजयाचा धिंगाणा घातला असता. न्यूयॉर्क उदार आहे, सहिष्णू आहे, लोकशाहीवादी आहे. न्यूयॉर्कच्या जनतेला सलाम!
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List