सांगलीतील सहा नगरपालिका, दोन नगरपंचायतींसाठी बिगुल
राज्यातील 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. त्यामध्ये जिह्यातील 6 नगरपालिका आणि दोन नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या. ईश्वरपूर, आष्टा, तासगाव, विटा, जत आणि पलूस नगरपालिका, तर शिराळा आणि आटपाडी नगरपंचायतींचा समावेश आहे. निवडणुका जाहीर झालेल्या क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली असून, राजकीय हालचालींना गती येणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रभागरचना आणि ओबीसी आरक्षणामुळे लांबणीवर पडल्या होत्या. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला फटकारल्याने निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. जिह्यातील ईश्वरपूर, आष्टा, तासगाव, विटा, जत आणि पलूस या सहा नगरपरिषदांसाठी, तर शिराळा व आटपाडी नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गेल्या काही दिवसांपासून तयारी सुरू होती. आता निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
ईश्वरपूरमध्ये शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध महायुतीत रंगणार आहे. राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील विरुद्ध अजित पवार, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष सम्राट महाडीक, जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडीक, शिवसेना शिंदे गट अशी लढत होईल. आष्टा येथे राष्ट्रवादीचे माजी आमदार स्वर्गीय विलासराव शिंदे गट व जयंत पाटील यांचा गट आणि विरोधात महायुती, असा सामना रंगणार आहे. ईश्वरपुरात नगराध्यक्षपदासाठी आनंदराव मलगुंडे, तर आष्टय़ात माजी उपनगराध्यक्ष विशाल शिंदे यांचे नाव राष्ट्रवादीकडून जाहीर करीत आघाडी घेतली आहे.
तासगावमध्ये माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय आर. आर. पाटील यांचे चिरंजीव व आमदार रोहित पाटील आणि माजी खासदार संजयकाका पाटील यांच्यात सामना रंगणार आहे. विटा नगरपालिकेमध्ये शिवसेनेचे आमदार सुहास बाबर विरुद्ध भाजपनेते वैभव पाटील यांच्या गटात चुरशीने निवडणूक होईल. पलूसमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप अशी निवडणूक रंगण्याची शक्यता आहे. जतमध्ये काँग्रेस, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप अशी निवडणूक रंगण्याची चिन्हे आहेत. भाजपचे आमदार गोपिचंद पडळकर यांच्यासोबत अजित पवार गटाचे नेते, माजी आमदार विलासराव जगताप हे जाणार की स्वतंत्र लढणार, याकडेही सर्वांचे लक्ष आहे.
शिराळा नगरपंचायतीमध्ये शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार व जिल्हा बँकेच अध्यक्ष मानसिंगराव नाईक विरुद्ध भाजप आमदार सत्यजित देशमुख, भाजप जिल्हाध्यक्ष सम्राट महाडीक यांच्यात रंगण्याची चिन्हे आहेत. अजितदादा राष्ट्रवादीचे नेते शिवाजीराव देशमुख कोणती भूमिका घेणार, याबाबतही उत्सुकता आहे. आटपाडी नगरपंचायतसाठी प्रथमच निवडणूक रंगणार आहे. तेथे भाजप आमदार गोपिचंद पडळकर यांनीही जोरदार मोर्चेबांधणी केली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List