गृहराज्य मंत्र्यांच्या मतदारसंघात वाळू माफियांचे थैमान, दापोलीत अवैध वाळू साठा जप्त; दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
दापोली तालुक्यात महसूल विभागाने अवैध गौण खनिज वाळू उपसा आणि साठ्याविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. येथील अडखळ खाडी किनारी आणि अडखळ (म्हैसौंडे) परिसरात सुमारे अडीच लाख रुपये किमतीची 25 ब्रास वाळू कायदेशीर परवान्याशिवाय साठवून ठेवल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी दोन आरोपींविरुद्ध भारतीय न्यायसंहिता आणि खाण व खनिज कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दापोली हा गृहराज्य मंत्री योगेश कदम यांचा मतदारसंघ आहे.यामतदारसंघात वाळू माफियांचे थैमान सुरू आहे. मंडळ अधिकारी, हर्णे तहसील कार्यालयाचे विनोद ज्ञानदेव जाधव (वय 46) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार अडखळ खाडी किनारी आणि त्यानंतर त्याच दिवशी मौजे अडखळ (म्हैसौंडे) खाडी किनारी हा वाळूचा साठा आढळून आला.
या घटनेची नोंदकरण्यात आली आहे. या प्रकरणात गु.र.नं. २०२/२०२५ नुसार भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३०३(२) (चोरी) आणि खाण आणि खनिज (नियमन आणि विकास) अधिनियम १९५७ चे कलम २१ (अवैध उत्खनन व वाहतुकीबद्दल दंड) या प्रमुख कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फैयाज महामूद खांचे (रा. अडखळ, ता. दापोली) आणि सैजाद मैनुद्दीन काझी (रा. अडखळ, ता. दापोली) या दोन आरोपींविरुद्ध ही कारवाई करण्यात आली आहे. आरोपींच्या ताब्यात वाळू उत्खनन करण्याचा कोणताही परवाना (लायसन्स) किंवा वैध रॉयल्टी पावती नसताना गौण खनिजाचा हा अवैध वाळू साठा आढळून आला. महसूल विभागाने जप्त केलेल्या एकूण वाळू साठ्याची किंमत सुमारे 2 लाख 50 हजार रुपये इतकी आहे. अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर प्रशासनाकडून सातत्याने कारवाई केली जाईल, असा इशारा महसूल अधिकाऱ्यांनी दिला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List