ठाणे महापालिकेचे 3 हजार 900 कोटी कुठे खर्च झाले? चौकशी करा, मुख्यमंत्र्यांना भाजपचे पत्र
ठाणे शहराच्या विकासासाठी गेल्या तीन वर्षांत महापालिकेला विशेष निधी स्वरूपात ३ हजार ९०० कोटी रुपये मिळाले होते. मात्र प्रत्यक्षात ठाणेकरांना अजूनही प्राथमिक सुविधा मिळवितानाही संघर्ष करावा लागत असल्याने विकासकामांसाठी आलेले ३ हजार ९०० कोटी नेमके कुठे खर्च झाले? शहारत कोणती विकास कामे झाली, याची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी भाजपाचे माजी गटनेते नारायण पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. पवार यांनी फडणवीस यांना तसे पत्रच पाठवल्याने पालिकेच्या तिजोरीवर डल्ला मारला कोणी, अशी चर्चा शहरात रंगली आहे.
केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून ठाणे महापालि केला कर्ज व विशेष अनुदान स्वरुपात मंजूर झालेल्या ६ हजार कोटींपैकी सुमारे ३ हजार ९०० कोटी पालि केकडे हस्तांतरित झाले होते. यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून क्लस्टर प्रकल्पासाठी विशेष अनुदान म्हणून १४९ कोटी रुपये आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून २१३ कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज असे साधारण ३ हजार ९०० कोटी रुपये उपलब्ध झाले. त्याआधी ‘स्मार्ट सिटी’च्या माध्यमातूनही केंद्र सरकार व राज्य सरकारकडून शहरातील विविध प्रकल्पांसाठी निधी दिला गेला. सुमारे चार हजार कोटी रुपयांच्या खर्चानंतर ठाणे शहरातील रस्ते, पाणीपुरवठा व इतर सुविधांबाबत आमूलाग्र परिवर्तनाची अपेक्षा होती. परंतु दुर्दैवाने शहरात बजबजपुरी वाढली असून वाहतूककोंडी, पाणीटंचाई आणि वाढत्या प्रदूषणाचा ठाणेकरांना सामोरे जावे लागत आहे.
माहिती देण्यास टाळाटाळ
कोट्यवधी रुपयांच्या कामांची नियोजनबद्ध अंमलबजावणी न झाल्यामुळे ठाणेकरांना सुविधा मिळत नाहीत. रस्ते, पाणीपुरवठा योजना, तलावांचे सुशोभीकरण, नाले बांधणी, गटारे, फुटपाथ, पायवाटा आदींसाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आला असल्याचे सांगितले जाते. मात्र प्रशासनाकडून सविस्तर माहिती देण्यास टाळाटाळ केली जाते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडे दाद मागत आहोत, असे पवार यांनी स्पस्ट केले.
यापूर्वी माजिवडा-कापूरबावडी, तीन हात नाका अशा ठिकाणी असलेली वाहतूककोंडी आता गल्ल्या-गल्ल्यांमध्ये भेडसावत आहे. ‘टीएमटी’ या सार्वजनिक परिवहन व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे.
रेल्वे स्टेशनवर सायंकाळी उतरलेल्या प्रवाशाला घरी पोचण्यासाठी तास-दीड तासांचा अवधी लागतो. वाहतूककोंडीतून घरी पोचल्यानंतर त्याला टँकरचे पाणी पिऊन तहान भागवावी लागते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List