जाऊ शब्दांच्या गावा – शाळा आणि चाळ
>> साधना गोरे
अनिल अवचटांनी त्यांच्या एका लेखात म्हटलं होतं, शाळा सुटल्यावर मुलं तुरुंगातून बाहेर पडणाऱ्या पैद्याप्रमाणे सुसाट घराकडे धाव घेतात, जणू त्यांना तिथं डांबून ठेवलं होतं. याचा अर्थ मुलांना शाळा तुरुंग वाटते, तर दुसरीकडे तुरुंगाला बंदीशाळा/शाळा असंही म्हणतात. शाळा हे शिकण्याचं ठिकाण. मग ‘बंदीशाळा’तल्या ‘शाळा’चा अर्थ काय?’ असा प्रश्न लगेच मनात येतो तोच व्यायामशाळा, अश्वशाळा, यज्ञशाळा, होमशाळा, गोशाळा, पाकशाळा, नृत्यशाळा, रत्नशाळा, वित्तशाळा हे शब्द आठवायला लागतात. म्हणजे एकेकाळी हा ‘शाळा’ शब्द आजच्या ‘पाठशाळा’ एवढय़ा मर्यादित अर्थाने वापरला जात नव्हता.
कृ. पां. कुलकर्णी म्हणतात, ‘शल् / शाला’ या संस्कृत शब्दापासून ‘शाळा’ शब्द आला. या शब्दाचा अर्थ घर, स्थान, ठिकाण असा आहे. या शब्दाचे अर्थात विशेषीकरण झाले आहे. या शब्दाचा मूळ अर्थ ‘जागा’ असा आहे, परंतु पुढे शिक्षणाची जागा, शिक्षणाची रीत, संप्रदाय, मंडळ, पद्धत असा अर्थ झाला. आता वरील गोशाळा, पाकशाळा इत्यादी शब्दांमध्ये ‘शाळा’ शब्द कसा आला असेल हे सहज लक्षात येतं. उदा. गायी पाळण्याची जागा ती ‘गोशाळा’, स्वयंपाकाची जागा म्हणजे ‘पाकशाळा’.
पाली भाषेत ‘शाळा’ या अर्थाचा ‘साला’ शब्द आहे. मराठीतल्या ‘साळसूद’ शब्दाचं मूळ यातच आहे. ‘साळसूद’ हे ‘शालाशुद्ध’चं बोलीतलं रूप. ‘शाला’ शब्द शिकण्याच्या प्रक्रियेशी जोडला गेल्यावर ज्याला रीतिभातीचं, व्यवहाराचं ज्ञान आहे, अशा मनुष्यालाही वापरला जाऊ लागला. या अर्थाने ‘साळसूद’ म्हणजे ज्यास रीतभात ठाऊक आहे असा; योग्य प्रकारे, रीतीने वागणारा, कोणताही अत्याचार न करणारा, निष्पाप, सरळ मनुष्य. नाणी पाडण्याच्या कारखान्याला मराठीत ‘टाकसाळ’ म्हटलं जातं. हा शब्दही ‘टंकशाला’चं बोलीतलं रूप आहे.
खोडय़ा करणारा, खोडकर या अर्थाने ‘खोडसाळ’ असंही म्हटलं जातं, पण इथला ‘साळ’ शब्द ‘शाळा’शी संबंधित आहे का? याविषयी कृ. पां. कुलकर्णींनी शंका उपस्थित केली आहे. कारण ‘शाला’चा मूळ अर्थ इथं घेतला तर खोडय़ा शिकवण्याची जागा असा अर्थ होईल किंवा खोडय़ा शिकवणारा, पण इथं अर्थ आहे – खोडय़ा करणारा मनुष्य. दाते-कर्वे यांच्या ‘महाराष्ट्र शब्दकोशा’त अभाव, न्यून या अर्थाचा ‘खोट’ शब्द आहे. या खोटचं रूप म्हणजे ‘खोड’ असा अर्थ दिला आहे. या अर्थानुसार ‘खोडसाळ’ म्हणजे शालीनता, सभ्यतेचा अभाव म्हणता येईल.
‘शाला’ या शब्दापासून मराठीत आणखी एक शब्द आला तो म्हणजे ‘चाळ’. ही तीच पुलंची ‘बटाटय़ाची चाळ’ किंवा मुंबईतल्या चाळी. ‘चाळ’ शब्दाचा शब्दकोशातला अर्थ आहे…सारख्या खोल्या असलेली लांबट आणि अरुंद इमारत. ‘शाला – साळ – चाळ’ या क्रमाने हा शब्द मराठीत आल्याचं शब्दकोशकार म्हणतात. आपल्या शाळांच्या इमारतीही चाळीच्या रचनेसारख्याच असतात हे इथं लक्षात घेण्याजोगं आहे.
संस्कृत भाषेशी साधर्म्य असणाऱ्या भाषा म्हणजे लॅटिन आणि ग्रीक. या भाषांमध्येसुद्धा ‘शाला’ या शब्दाच्या ध्वनी आणि अर्थाशी साम्य असणारे शब्द आहेत. लॅटिनमध्ये जागा किंवा घर या अर्थाचा cella (सेला) हा शब्द आहे, तर ग्रीकमध्ये याच अर्थाचा chalta हा शब्द आहे.
पश्चिम महाराष्ट्रात ‘अमक्याने तमक्याची शाळा घेतली’ असा शब्दप्रयोग वापरला जातो. सर्वसाधारणपणे शाळा हे ज्ञान, माहिती मिळवण्याचं ठिकाण. शाळेत जाऊन मनुष्य शहाणा होतो, असं समजलं जातं, पण हा शब्दप्रयोग एखादा मनुष्य चुकीचं वागत असेल तर त्याला उपदेश करणं, समज देणं या अर्थाने वापरला जातो. आणखी एक शब्दप्रयोग म्हणजे ‘त्या दोघांनी शाळा केली’ किंवा ‘त्यांची शाळा झाली आहे’. या शब्दप्रयोगात त्यांनी एकत्र येऊन कटकारस्थान केलं, लबाडी केली असा नकारात्मक भाव आहे.
अगदी सरकारी घोषवाक्यं वाटावीत अशा म्हणी म्हणजे…‘अरे बाळा, घरची शाळा’ किंवा ‘जशी शाळा तशी बाळा’. लहानपणी मुलांना जे शिक्षण मिळेल अगर ज्या शिस्तीत ती वाढतील त्याप्रमाणे त्यांना वळण लागते या अर्थाने हे शब्दप्रयोग वापरले जातात. मुलाला एखादी सामान्य गोष्ट माहीत नसेल तर ‘तुझ्या शाळेत काय शिकवतात की नाही?’, असा प्रश्न सहजच विचारला जातो. त्यातून शाळा आणि ज्ञान यांचं नातं ठळक होताना दिसतं.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List