हरयाणा बनले सर्वात प्रदूषित राज्य
दिवाळीत दिल्ली आणि आसपासच्या भागात प्रदूषणाचे धुके पाहायला मिळाले. दिल्लीसह अन्य भागातील हवेची गुणवत्ता विषारी राहिली असून हरयाणा सर्वात प्रदूषित राज्य बनले आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माहितीनुसार, दिल्लीचा हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) 345 नोंदवण्यात आला असून हा अत्यंत ‘गंभीर’ श्रेणीत येतो. तर काही भागात एक्यूआय 400 च्या पार गेला आहे. पंजाबी बाग येथे 433 आणि वजीरपूर येथे 401 एक्यूआय नोंदवले गेले आहे. दिल्लीतील 38 पैकी 34 निरीक्षण केंद्रांवर प्रदूषण पातळी रेड झोनमध्ये पोहोचली आहे. म्हणजेच हवेची गुणवत्ता अत्यंत खराब ते गंभीर अवस्थेपर्यंत पोहोचली आहे, असे प्रदूषण नियंत्रण मंडळाने म्हटले आहे.
सर्वाधिक प्रदूषित हवा असलेल्या 10 शहरांपैकी आठ शहरे ही
हरयाणात आणि एक राजस्थानमधील आहे. तर दिल्ली हे 10 व्या क्रमांकावर आहे. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारीही दिल्लीतील बहुतेक भागात प्रदूषणाची पातळी 300 च्या पुढे गेली. सर्वोच्च न्यायालयाने 18 ते 21 ऑक्टोबरदरम्यान दिल्ली-एनसीआरमध्ये हिरव्या फटाक्यांची विक्री आणि फोडणी करण्यास परवानगी दिली होती. परंतु या चार दिवसात लोकांना केवळ सकाळी 6 ते 7 आणि रात्री 8 ते 10 वाजेपर्यंत म्हणजेच केवळ तीन तासांसाठी ग्रीन फटाके फोडण्याची परवानगी असेल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते. दिल्ली-एनसीआरमध्ये दिवाळीच्या दिवशी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे उघडपणे उल्लंघन करण्यात आले.
भाजप मंत्र्याने हात झटकले
दिल्लीच्या भाजप सरकारमधील पर्यावरण मंत्री मनजिंदर सिंग सिरसा यांनी दिल्लीतील प्रदूषणाला सरकार जबाबदार नाही, असे सांगत प्रदूषणावरून हात झटकले. दिल्लीतील प्रदूषणासाठी त्यांनी पंजाब सरकारला जबाबदार धरले. पंजाबमधील आप सरकारने शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात पेंढा जाळण्यास भाग पाडले, ज्यामुळे दिल्लीची हवा प्रदूषित झाली, असा अजब दावा त्यांनी या वेळी केला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List