मुंबईत संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासारखं वातावरण; ही लढाई लोकशाही वाचवण्यासाठी, हे काँग्रेसनं समजून घ्यावं! – संजय राऊत
काँग्रेस पक्ष हा आमचा इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीतील मित्र पक्ष आहे. या दोन्ही आघाड्या या एकाच पक्षामुळे निर्माण झाल्या नाहीत. त्यात काँग्रेस बरोबर आमच्या सारखे अनेक पक्ष आहेत. म्हणून महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी निर्माण झाली. मुंबई महानगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत कुणीतरी वेगळी भूमिका घेतली असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. पण आम्ही आमच्याकडून आमच्या मित्रपक्षांना, सहकाऱ्यांना अडचणीत येणारे कोणतेही विधान करणार नाही किंवा भूमिका घेणार नाही, असे स्पष्ट मत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. तसेच मुंबईत संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासारखं वातावरण असून ही लढाई लोकशाही, संविधान आणि मुंबई वाचवण्यासाठी आहे, हे काँग्रेसने समजून घेतले पाहिजे, असेही राऊत म्हणाले. ते गुरुवारी सकाळी माध्यमांशी संवाद साधत होते.
संजय राऊत पुढे म्हणाले की, राज ठाकरे मनसेचे प्रमुख आहेत. त्यांचा स्वतंत्र पक्ष आहे आणि त्यांच्यामुळे कुणी ही भूमिका घेत असेल तर तो ही त्यांचा प्रश्न आहे. आम्हाला भाजपचा पराभव करायचा आहे. आम्हाला मुंबई अदानीच्या घशात घालण्यापासून वाचवायची आहे. या मुंबईसाठी संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन झाली होती. त्यात सुद्धा अशा प्रकारे सर्व पक्ष एकत्र आले होते. काँग्रेसच्या नेत्यांनी हा इतिहास समजून घेणे फार गरजेचे आहे. मुंबईचा लढा हा संयुक्त महाराष्ट्राचा लढा होता आणि त्यात सर्व मतभेद विसरून सर्व पक्ष एकत्र आले होते. आता पुन्हा एकदा त्याच प्रकारे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासारखे वातावरण मुंबईत आहे.
मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे, ती मराठी माणसाच्या हातात राहायला पाहिजे. म्हणून काँग्रेस पक्षातील मराठी नेतृत्वाने मुंबईवरचे पुढले जे संकट आहे त्याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. आम्हाला जर काही बोलायचे असेल तर आम्ही राहुल गांधी, मल्लिकार्जून खरगे, केसी वेणुगोपाल, रमेश चेन्नीथला यांच्याशी बोलू. या चारही प्रमुख लोकांशी अद्याप साधी चर्चाही झालेली नाही. त्याच्यामुळे उगाच आकांड तांडव करण्याची गरज नाही. आम्ही सगळे एकत्र येऊन एक नोव्हेंबरला निवडणूक आयोगाविरुद्ध मोर्चा काढत आहोत. त्यात काँग्रेसलाही आमंत्रण आहे. राज ठाकरे, शरद पवार, डावे पक्षही आहेत. ही लढाई लोकशाही वाचवण्यासाठी आहे हे काँग्रेसने समजून घेतले पाहिजे. लोकशाही, संविधान आणि मुंबई वाचवण्याची लढाई अत्यंत निकराची लढाई आहे, हे आमच्या सहकाऱ्याने समजून घेतले तर मराठी माणूस हे उपकार कायम लक्षात ठेवेल, असेही राऊत म्हणाले.
मुंबईवर काँग्रेसचा महापौर बसवायचा, असे विधान भाई जगताप यांनी केले. याबाबत विचारले असता राऊत म्हणाले की, आम्हाला तर काँग्रेसचा पंतप्रधान करायचा होता, पण नाही होऊ शकला. आम्ही इंडिया आघाडी निर्माण केली, कारण आम्हाला राहुल गांधींना पंतप्रधान करायचे होते. आम्ही असे नाही म्हणालो की, शिवसेनेचा पंतप्रधान करायचा किंवा अन्य पक्षांचा करायचा. आमचा विचार, आमची भूमिका स्पष्ट आणि पारदर्शक आहे. काँग्रेस राष्ट्रीय पक्ष आहे. त्याच्यामुळे आमचे मन फार मोठे आहे आणि राहुल गांधी यांनाच पंतप्रधान करायचे आहे. मुंबईच्या महापौरांचे काय घेऊन बसले. मुंबईच काय 27 महापालिकांचे महापौर काँग्रेसचे करा, काही अडचण नाही. भाजपच्या पैशाच्या भ्रष्ट राजकारणासमोर ऐक्याचे आव्हान उभे करणे ही आमची भूमिका आहे. महापौर मराठी होणे, मराठी मातीतला होणे याला आम्ही प्राधान्य देतो.
मुंबईवर गेल्या तीस वर्षापेक्षा जास्त काळ शिवसेनेचा महापौर, मराठी महापौर झालेला आहे आणि त्याचे श्रेय शिवसेनेला द्यावे लागले. अनेकदा आम्ही त्यासाठी काँग्रेसचे सहकार्य घेतले हे विसरता येणार नाही. मुंबईतील समस्त मराठी माणूस महाराष्ट्रप्रेमी माणूस मग मुसलमान असतील, गुजराती, जैन, पारशी हे सगळे या वेळेला आमच्या बरोबर आहेत, असेही राऊत म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List