Ratnagiri News – दिवाळीच्या मुहूर्तावर पाठविलेल्या हापूस आंब्याचा पेटीला विक्रमी 25 हजाराचा दर, देवगड तालुक्याने पटकावला मान
जगप्रसिध्द असलेला देवगडचा हापूस आंबा यंदा ऑक्टोबर महिन्यातच मुंबई वाशीमधील APMC फळ बाजारात यंदा दिवाळीच्या दिवशी दाखल झाला. विशेष म्हणजे देवगड तालुक्यातीलच पडवणे येथील आंबा बागायतदार प्रकाश धोंडू शिर्सेकर यांची पहिली पेटी दिवाळीच्या मुहूर्तावरच वाशी मार्केटमध्ये पाठविण्यात आली होती. हा आंबा पिकल्यानंतर 6 डझन आंब्याचा पेटीला विक्रमी असा 25 हजार रूपये दर मिळाला आहे. वाशी मार्केटमध्ये आजवर विकल्या गेलेल्या आंब्यापैकी या आंब्याला सर्वाधिक दर मिळाल्याची माहिती येथील व्यापाऱ्यांनी दिली आहे.
वाशीतील एपीएमसी फळ बाजारात दरवर्षी नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये मुहूर्ताचा हापूस दाखल होत असतो. यंदा मात्र ऑक्टोबर महिन्यातच दिवाळी दिवशी देवगड तालुक्यातील पडवणे येथील आंबा बागायतदार प्रकाश धोंडू शिर्सेकर यांनी दिवाळीच्या मुहूर्तावर 6 डझन हापूस आंब्याची पेटी मार्केटमध्ये पाठविली होती. वाशी येथील नानाभाऊ जेजूरकर अँड कंपनी यांच्याकडे आलेल्या या आंब्याचा पेटीची लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजा करण्यात आली होती. या दिवशी आंबा पेटी दाखल होण्याची पहिलीच वेळ असल्याचे येथील व्यापारी वर्गाकडून सांगण्यात येत आहे. याआधीही, पाच वर्षापूर्वी शिर्सेकर यांनी हापूस पेटी वाशी मार्केटला पाठविण्याचा मान मिळविला होता. मात्र, या वर्षी त्यांनी ऑक्टोबर महिन्यातच आंबा पेटी पाठवून दिवाळीचा मुहूर्त साधला. परंतू हा आंबा कच्चा असल्याने त्याची पूजा करून तो पिकविण्यास ठेवला होता. हा आंबा पिकल्यानंतरच त्याची बोली लावली जाणार होती. त्यानूसार या आंब्याची बोली लागल्यानंतर 6 डझन आंब्याचा पेटीला विक्रमी असा दर भेटला आहे, अशी माहिती व्यापारी हर्षल जेजुरकर यांनी दिली आहे.
एपीएमसी मार्केटमध्ये आजवर दाखल होणाऱ्या कोकणातील मुहूर्ताचा हापूस आंब्याला 20 ते 22 हजार दर मिळाला होता. यावर्षी मात्र देवगडमधील आंब्याने या साऱ्या दरांना मागे टाकत विक्री असा 25 हजाराचा दर मिळविला आहे. आंबा बागायतदार प्रकाश शिर्सेकर यांनी आपण दिवाळीच्या मुहूर्तावर पाठविलेल्या हापूस आंब्याचा पेटीला चांगला समाधानकारक दर मिळाला असे सांगीतले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List