‘समीक्षा’ प्राचीन हिंदुस्थानी शास्त्रार्थांचा अनुभव देणारी स्पर्धा, वैदिक परंपरांविषयी जागृतीचा अनोखा प्रयत्न
वैदिक काळातील आचार्यांच्या शास्त्रार्थांविषयी आपण पुस्तकातून वाचलं असेल. पण हे शास्त्रार्थ म्हणजे काय? यामध्ये कोणते विषय निवडले जायचे? आजही शास्त्रार्थांची आवश्यकता आहे का? याविषयी जागृती आणण्याचा प्रयत्न काही वर्षांपासून नाशिकमध्ये सुरू आहे.
श्री गोपालकृष्ण सेवा संघ संचलित कृष्ण द्वैपायन गुरुकुल आणि हं. प्रा. ठा. कला रा. य. क्ष. विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘समीक्षा’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दि. ३१ ऑक्टोबर, २०२५ रोजी ही स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. प्राचीन हिंदुस्थानी शास्त्रार्थ परंपरेच्या धर्तीवर आयोजित हिंदुस्थानी शास्त्र, परंपरा, संस्कृती इत्यादि विषयांवर मौखिक सादरीकरणे आणि मुक्त प्रश्नोत्तरांची स्पर्धा असे या स्पर्धेचे स्वरुप आहे.
यंदाच्या स्पर्धेत मराठी आणि इंग्रजी विषयांचा समावेश करण्यात आला होता. मराठी विषयांमध्ये नाटकाचा दैनंदिन आयुष्यातला उपयोग, स्वरस्फोटसिद्धान्त, दर्शनांच्या संकल्पना आणि संकल्पनांचे दर्शन, वर्णव्यवस्था आणि आधुनिक भारत, अवधानाची कमतरता : तरुणाईची मोठी समस्या, योगशास्त्रातील षट्चक्र आणि त्याचे दैनंदिन उपयोजन असे विषय निवडण्यात आले होते. तर Women’s perspective on socio-economic changes : seeking a Holistic outlook आणि Sublimation and Indian Art Therapy अशा इंग्रजी विषयांचा समावेश करण्यात आला होता.
या स्पर्धेत श्रोत्यांमधून गौरी पवार, अंबादास कांबळे, वैखरी रानडे आणि श्रीरंग पंचभाई यांना उत्कृष्ट प्राश्निक म्हणून गौरवले गेले. उत्कृष्ट सादरीकरणाकरिता मधुरा मालपाठक यांना सन्मानपत्र आणि रु. ५०००, उत्कृष्ट विषयनिवडीसाठी श्रीरंग पंचभाई सन्मानपत्र आणि रु. ५००० आणि सर्वोत्कृष्ट समीक्षेकरिता सन्मानपत्र आणि रु. १०,००० हे पारितोषिक संहिता देशपांडे यांना देऊन गौरवण्यात आले. यावेळी पारितोषिकांच्या एकूण रकमेच्या २५% रकमेची विद्यार्थ्यांना पुस्तके देण्यात आली.
या स्पर्धेसाठी प्राश्निक म्हणून डॉ. स्वाती भावसार, श्री. प्रशांत पंचभाई आणि डॉ. प्रतिमा वामन यांनी काम पाहिले. मा. श्री. अंकित रावल यांनी परीक्षण केले.
दरम्यान, पारितोषिक प्रदान सोहळ्याला मा. डॉ. विनायक गोविलकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
रुचिता पंचभाई, डॉ. लीना हुन्नरगीकर, डॉ. तन्मय भोळे आणि निखिल जगताप यांच्या संकल्पनेतून प्राचीन ज्ञान-परंपरा आधुनिक दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी दरवर्षी समीक्षा ही स्पर्धा घेतली जाते. या कार्यक्रमावेळी बोलताना ‘पुढील वर्षी जास्तीत जास्त स्पर्धकांनी यात सहभागी व्हावे’, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List