मतचोरीविरोधात उद्या सत्याचा मोर्चा, सर्वपक्षीय बैठकीत तयारीचा आढावा; शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्यासह काँग्रेस आणि डाव्या पक्षांचे नेते नेतृत्व करणार
मतदार याद्यांमधील प्रचंड घोळ आणि मतचोरीचा निषेध करण्यासाठी 1 नोव्हेंबरला मुंबईत सर्वपक्षीय विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाची जय्यत तयारी सुरू आहे. राज्यभरातील लाखो नागरिक या मोर्चात सहभागी होणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, काँग्रेसचे राज्यातील ज्येष्ठ नेते, डाव्या पक्षांचे नेते या मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत. या मोर्चाच्या नियोजनाबाबत सर्वपक्षीय नेत्यांची आज बैठक झाली. त्यानंतर संयक्त पत्रकार परिषद घेऊन मोर्चाबाबत माहिती देण्यात आली.
मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये ही बैठक झाली. त्यात मोर्चाची तयारी आणि नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीला उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड, काँग्रेस नेते नसीम खान, सचिन सावंत, कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड प्रकाश रेड्डी, शेकापचे जयंत पाटील, शिवसेना नेते-खासदार अनिल देसाई, आमदार ऍड. अनिल परब, मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, साईनाथ दुर्गे आदी उपस्थित होते. दीड तास ही बैठक चालली.
बैठकीनंतर संयुक्त पत्रकार परिषद घेऊन प्रसारमाध्यमांना माहिती देण्यात आली. निवडणूक आयोगाचा बेजबाबदार कारभार, मतदार यादीतील घोळ, निवडणुकांतील गैरव्यवहार याबाबत लोकांना सत्य कळावे आणि असत्य जनतेसमोर जावे यासाठी विरोधी पक्षातील महाविकास आघाडीतील सर्व पक्ष, मनसे आणि ज्यांना आपले मत चोरीला गेलेय असे वाटतेय ते सर्व मतदार लाखोंच्या संख्येने या मोर्चात सहभागी होतील, असे आमदार अनिल परब यांनी यावेळी सांगितले.
“आम्ही मतचोरीचा बारकाईने अभ्यास करत आहोत. मतदार यादीतील घोळ दूर झाले पाहिजेत आणि आम्ही घेतलेल्या आक्षेपांवर आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी दुबार मतदार आणि
 व्हीव्हीपॅटबाबत जे सांगितले त्यावरही आम्ही अभ्यास करत आहोत. आमचा मोर्चा विरोधी पक्षांच्या आणि मतदारांच्या मागणीसाठी आहे,’’ असे अनिल परब म्हणाले.
आयोगाची टाळाटाळ
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅट मशीनचा वापर करण्याची तरतूद कायद्यात नसल्याचे स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयोगाने दिले आहे, मात्र ते कारण संयुक्तिक नसल्याचे काँग्रेस नेते सचिन सावंत यावेळी म्हणाले. 2017 मध्ये नांदेड-वाघाळा महापालिका वॉर्डात याच व्हीव्हीपॅटचे टेस्टिंग केले गेले होते. त्यावेळी कोणत्या कायद्याने त्यांना बंधन घातले होते हा मूळ मुद्दा आहे. त्यामुळे निवडणूक आयोग जाणीवपूर्वक टाळाटाळ करत आहे, असा आरोप त्यांनी केला. काँग्रेसचे सर्व वरिष्ठ नेते या मोर्चात सहभागी होतील, असे त्यांनी सांगितले.
दरोडेखोराला पकडायला अख्खा गाव एकत्र आलाय!
एका दरोडेखोराने गावावर दरोडा घातलाय आणि अख्खा गाव त्या दरोडेखोराला पकडायला एकत्र आलाय, अशा शब्दांत यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मोर्चाचे वर्णन केले.
मुंबईकरांना त्रास होऊ नये म्हणून…
मोर्चाला परवानगी घेण्याबाबत पोलीस आयुक्तांची भेट घेऊन त्यांना मोर्चाच्या नियोजनाबाबत सर्व माहिती देण्यात आली आहे. 48 तास अगोदर मोर्चाला परवानगी दिली जाते आणि मोर्चाला परवानगी मिळेल असा विश्वास आहे, असे अनिल परब यांनी सांगितले. सर्वसामान्य मुंबईकरांना त्रास होऊ नये यासाठी मोर्चा दुपारी 1 ते सायंकाळी 4 या कालावधीत ठेवण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
आम्ही फाशी आणि जेलला घाबरणारे नाही
बोगस आधारकार्डच्या आधारे मतदार नोंदणी केली जातेय याचे सादरीकरण करताना आमदार रोहित पवार यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचेही आधार कार्ड प्रात्यक्षिकासह काढून दाखवले होते. त्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात पत्रकारांनी विचारले असता आव्हाड म्हणाले की, ‘चोरी पकडली गेल्याने घाबरलेले राज्य सरकार अशा गोष्टींचा अवलंब करणारच, रोहित पवार यांना घाबरवण्यासाठी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला गेला आहे पण आम्ही फाशी आणि जेलला घाबरणारे नाही, हा देश गांधी, नेहरू आणि भगतसिंगांचा आहे, रोहित पवारसारखे नेते घाबरणारे नाहीत, ते बिनधास्त निवडणूक आयोगाला नडत आहेत,’ असे आव्हाड म्हणाले.
असा असेल मोर्चाचा मार्ग
दुपारी 1 वाजता फॅशन स्ट्रीट येथून मोर्चाला सुरुवात होईल. तेथून मेट्रो सिनेमामार्गे मोर्चा मुंबई महानगरपालिका मुख्यालयापर्यंत जाईल. तिथे सर्व प्रमुख नेते मोर्चाला मार्गदर्शन करणार आहेत. त्याचवेळी आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार आहे.
पार्किंग व्यवस्था आणि मोर्चाच्या मार्गासाठी क्यूआर कोड
मुंबईतील दोन्ही उपनगरांतून लोकल, बसेस तसेच पूर्व व पश्चिम द्रुतगती महामार्गावरून वाहनांमधून लोक मोर्चासाठी येणार आहेत. वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था व मोर्चाचा मार्ग यासंदर्भात त्यांना माहिती मिळावी म्हणून उद्या क्यूआर कोड दिला जाणार आहे. तो स्कॅन केल्यावर त्यांना संपूर्ण माहिती मोबाईलवर उपलब्ध होणार आहे.
About The Author
 
                 सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
 
          
          
          
          
                 
                 
                 
                 
                 
                 
               
Comment List