सामना अग्रलेख – इडापीडा टळू दे…!

सामना अग्रलेख – इडापीडा टळू दे…!

सरकारने जर नुकसानभरपाई दिवाळीपूर्वीच शेतकऱ्याला दिली असती तर राज्यातील लाखो शेतकऱ्यांवर दिवाळीचा आनंदही ‘उधार-उसनवारी’वर घेण्याची वेळ आली नसती. बळीराजाने घरातील पणत्या ‘उधारी’च्या तेलावर पेटवून यंदाची दिवाळी त्याच्यापुरती ‘प्रकाशमान’ करून घेतली असली तरी येणारा रब्बी हंगाम कसा पार पडणार? सरकारची नुकसानभरपाई कधी मिळणार? असे असंख्य प्रश्न आहेतच. सत्ताधाऱ्यांकडून या प्रश्नांच्या उत्तराची वाट न पाहता आपणच आपले सण गोड करून घ्यायचे, असे किती दिवस चालणार? यंदाची दिवाळी ही वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक ठरो! या दिवाळीने महाराष्ट्रातील शेतकरीविरोधी सरकारची इडापीडा टळू दे आणि खऱ्या अर्थाने येथे बळीराजाचे राज्य येऊ दे!

दिवाळीच्या आनंददायी आणि चैतन्यदायी पर्वाला सुरुवात झाली आहे. 18 ऑक्टोबरला धनत्रयोदशी झाली. घरोघरी धनाची, धन्वंतरीची पूजा झाली. आज सर्वत्र नरक चतुर्दशीचे अभ्यंगस्नान पार पडले. उद्यापासून तीन दिवस लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीजही याच उत्साहात साजरी होईल. यंदाची दिवाळी पाच दिवसांची आहे. त्यामुळे हे पाच दिवस घराघरांत रोषणाई, आकाश पंदील, फटाक्यांची आतषबाजी, नवीन वस्तू, कपड्यांची खरेदी, उलाढालीमुळे फुललेल्या बाजारपेठा, उद्योग-व्यवसाय हेच चित्र असणार आहे. दिवाळी हा एकच सण असा आहे की, जो श्रीमंतापासून गरीबापर्यंत आणि बंगल्यापासून झोपडीपर्यंत सर्वत्र तेवढ्याच उत्साहात साजरा होतो. श्रीमंत असो, नोकरदार असो की हातावर पोट भरणारा गरीब, प्रत्येकाची दिवाळी आपापल्या कुवतीनुसार साजरी होते, परंतु प्रत्येकाच्या उत्साहात कमी-जास्त नसते. हिंदू सणांमध्ये म्हणूनच दिवाळीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. खरे तर देशात आणि महाराष्ट्रात सर्व काही आलबेल आहे, आनंदी आनंद आहे, अशी स्थिती नाही. महागाईने सामान्य माणसाला कुटुंबाचे रहाटगाडगे चालविणे मुश्कील झाले आहे. सरकार रोजगाराचे नवनवे आकडे देत असले तरी प्रत्यक्षात बेरोजगारीच्या

दाहक वास्तवाने

तरुण वर्गाच्या जीवनात अंधार पसरला आहे. महाराष्ट्रात तर अशा असंख्य समस्यांसोबत यंदा भयंकर अतिवृष्टीचे संकट कोसळले. त्यात शेती आणि शेतकरी पुरता उद्ध्वस्त झाला. या आपत्तीचे आणि राज्य सरकारच्या नाकर्तेपणाचे सावट यंदाच्या दिवाळीवर आहे. एकीकडे अस्मानी आणि दुसरीकडे राज्य सरकारच्या कारभाराची सुलतानी अशा दुहेरी संकटात बळीराजाची दिवाळी सापडली आहे. हातातोंडाशी आलेले खरिपाचे पीक अतिवृष्टीने ओरबाडून नेले. लाखो हेक्टर शेतजमीन खरवडून निघाल्याने रब्बीचा हंगाम कसा घ्यायचा, खरिपासाठी घेतलेले कर्ज कसे फेडायचे आणि पुढचे दिवस कुटुंबाची गुजराण कशी करायची? असे मोठे प्रश्न आज बळीराजासमोर आहेत. ज्या सरकारने या प्रश्नांची उत्तरे द्यायची, या भयंकर संकटातून त्याला बाहेर पडण्यासाठी हात द्यायचा ते राज्यकर्ते आर्थिक मदतीच्या फक्त घोषणा आणि वल्गनाच करीत आहेत. त्यामुळे ‘दिवाळीपूर्वी प्रत्येक अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्याला नुकसानभरपाईची रक्कम देणार म्हणजे देणारच’ ही सरकारची घोषणा हवेतच विरली आहे. त्यामुळे दिवाळी कशी साजरी करायची, हा

प्रश्न बळीराजासमोर

उभा आहे. पण निदान हे पाच दिवस तरी कुटुंबाचे, कच्च्याबच्च्यांचे तोंड गोड करायलाच हवे ही उमेद आणि ऊर्जा सामान्य माणसाला शेवटी दिवाळीच देत असते. अतिवृष्टीग्रस्त बळीराजाही त्याला अपवाद कसा असेल, परंतु नाकर्त्या राज्यकर्त्यांचे काय? महाराष्ट्राला या संकटप्रसंगी आर्थिक मदत न देणाऱ्या केंद्र सरकारचे काय? आश्वासन दिल्याप्रमाणे सरकारने जर नुकसानभरपाई दिवाळीपूर्वीच शेतकऱ्याला दिली असती तर राज्यातील तब्बल 29 जिल्ह्यांतील लाखो शेतकऱ्यांवर दिवाळीचा आनंदही ‘उधार-उसनवारी’वर घेण्याची वेळ आली नसती, पण ज्या सरकारचाच कारभार नऊ लाख कोटी रुपयांच्या ‘कर्जा’वर सुरू आहे ते सरकार राज्यातील शेतकरी आणि सामान्य माणसाची दिवाळी काय गोड करणार? बळीराजाने घरातील पणत्या ‘उधारी’च्या तेलावर पेटवून यंदाची दिवाळी त्याच्यापुरती ‘प्रकाशमान’ करून घेतली असली तरी येणारा रब्बी हंगाम कसा पार पडणार? सरकारची नुकसानभरपाई कधी मिळणार? असे असंख्य प्रश्न आहेतच. सत्ताधाऱ्यांकडून या प्रश्नांच्या उत्तराची वाट न पाहता आपणच आपले सण गोड करून घ्यायचे, असे किती दिवस चालणार? यंदाची दिवाळी ही अंधारावर प्रकाशाच्या आणि वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक ठरो! या दिवाळीने महाराष्ट्रातील शेतकरीविरोधी सरकारची इडापीडा टळू दे आणि खऱ्या अर्थाने येथे बळीराजाचे राज्य येऊ दे!

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पॅण्ट्री कर्मचाऱ्यांचे किळसवाणे कृत्य,  व्हिडीओ व्हायरल झाल्यावर रेल्वेने केली कारवाई पॅण्ट्री कर्मचाऱ्यांचे किळसवाणे कृत्य, व्हिडीओ व्हायरल झाल्यावर रेल्वेने केली कारवाई
रेल्वेतून प्रवास करताना पॅण्ट्रीतून जेवणं घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. रेल्वेतील एक किळसवाणा प्रकार समोर आला असून येथील...
शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने 1 कोटी 38 लाखांचा गंडा; पुण्यातील आयटी इंजिनीअरची फसवणूक
Mumbai fire – कफ परेड भागातील चाळीत अग्नितांडव; 15 वर्षीय मुलाचा होरपळून मृत्यू, तिघे गंभीर जखमी
पोटच्या मुलीवर अत्याचार; नराधम पित्याला सक्तमजुरी
घरी दही वडा करताना या टिप्स न विसरता लक्षात ठेवा, वाचा
खोटा गुन्हा दाखल करून प्रतिष्ठेला डाग लावला! दिलीप खेडकर गंभीर यांचा पोलिसांवर आरोप
धरणफुटीचा धोका ओळखणाऱ्या यंत्रणेला जर्मन पेटंट, शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांचे संशोधन