चांदीला ’सोन्याचे’ दिवस येणार, पीएनजी ज्वेलर्सचे सौरभ गाडगीळ यांचा अंदाज
टॅरिफ वॉर, चीप वॉर आणि जागतिक पातळीवरील भू-राजकीय तणावामुळे सध्या गुंतवणूकदारांचा ओढा सोने व चांदीतील गुंतवणुकीकडे वाढला आहे. त्यातही चांदीची मागणी वाढली असून चांदीचा भाव किलोमागे 1 लाख 90 हजारांपर्यंत पोहोचला आहे. नजीकच्या काळात हा भाव तिपटीने वाढून साडेपाच ते सहा लाखांवर जाऊ शकतो, असा अंदाज पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ यांनी व्यक्त केला.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गाडगीळ यांनी सोने-चांदीतील सध्याच्या गुंतवणुकीचा एकूण पॅटर्न आणि त्याच्या कारणांचे विश्लेषण केले. ‘चांदीची मागणी सध्या कमालीची वाढली आहे. ही मागणी केवळ गुंतवणुकीमुळे वाढलेली नाही. औद्योगिक वापरासाठीही चांदीला मागणी आहे. एआय चीप, मायक्रोप्रोसेसर किंवा नॅनो चीप अशा अनेक अत्याधुनिक उपकरणांमध्ये चांदीचा वापर केला जातो. सध्या जगातील मोठय़ा देशांत चीप वॉर सुरू असल्याने चांदीचे महत्त्व वाढले आहे. जगातील 20 टक्के चांदी आपल्याकडेच असावी असा प्रयत्न चीनने चालवला आहे. जगात दबदबा राखायचा असेल तर चांदी हवी हे बऱयाच देशांनी ओळखले आहे. टॅरिफचा दबाव वाढल्यास इतर देशही चीनप्रमाणे भूमिका घेण्याची शक्यता आहे. त्यातून चांदीची मागणी आणखी वाढू शकते, असे गाडगीळ म्हणाले.
शेअर बाजारात मोठय़ा करेक्शनची शक्यता
शेअर बाजारातील तेजीवरही गाडगीळ यांनी भाष्य केले. ‘सध्या अमेरिकी शेअर बाजार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यातील 50 टक्के वाढ एनवीडियासारख्या एआय कंपन्यांच्या वाढीमुळे आहे. मात्र एआय कंपन्यांतील ही वाढ फुगा असण्याची दाट शक्यता आहे. कारण एआय हे सध्या बाल्यावस्थेत आहे. त्याचा एकूण आवाका, दर्जा, अचूकता, परिणामकारकता हे सिद्ध व्हायचे आहे. हे सगळे होण्याआधीच त्याला कमालीचे महत्त्व मिळाले असून एआय कंपन्यांचे मूल्य वाढले आहे, मात्र त्याला तार्किक आधार नाही. एआय भविष्यात राहील, पण त्याची भूमिका कितपत असेल हे अद्याप निश्चित झालेले नाही. ‘डॉटकॉम बूम’च्या काळातही नेमके हेच झाले होते. ‘क्विक कॉमर्स’, ‘स्टार्टअप्स’चाही असाच बोलबाला होता. आता सगळेच योग्य जागेवर येत आहेत. ‘एआय’चेही तसे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरच शेअर बाजारात मोठे करेक्शन दिसण्याची शक्यता गाडगीळ यांनी व्यक्त केली. अनेकांना याचा अंदाज आल्याने सोने, चांदी, तांबे, प्लॅटिनम अशा धातूंमधील गुंतवणूक वाढत चालली आहे, असे ते म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List