शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने 1 कोटी 38 लाखांचा गंडा; पुण्यातील आयटी इंजिनीअरची फसवणूक
शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळेल, अशा आमिषाने कर्वेनगर परिसरातील एका आयटी इंजिनीअरची तब्बल १ कोटी ३८ लाख ४४ हजार रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ऑनलाइन माध्यमातून ही फसवणूक करण्यात आली असून, याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत कर्वेनगर येथील ४५ वर्षीय तरुणाने फिर्याद दिली. ११ एप्रिल ते १२ जून २०२५ या कालावधीत ही घटना घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे आयटी क्षेत्रात कार्यरत असून, उच्चशिक्षित आहेत. सायबर चोरट्याने मोबाईलवरून त्यांच्याशी संपर्क साधला आणि ‘शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास आकर्षक परतावा मिळेल,’ असे सांगत त्यांना एका लिंकद्वारे अॅप डाऊनलोड करण्यास प्रवृत्त केले. त्या अॅपद्वारे खाते उघडून सुरुवातीला काही छोटे परतावे देण्यात आले, ज्यामुळे फिर्यादी यांचा विश्वास बसला. त्यानंतर गुंतवणुकीचा आकडा वाढत गेला आणि सायबर चोरट्याच्या सांगण्यावरून फिर्यादीने वेळोवेळी तब्बल १ कोटी ३८ लाख ४४ हजार रुपये बनावट प्लॅटफॉर्मवर गुंतवले.
काही दिवसांनी सायबर चोरट्यांनी त्यांच्याशी संपर्क तोडला. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्याक्षणी त्यांनी सायबर पोलिसांत धाव घेतली. त्यानुसार सायबर पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
उच्चशिक्षित तरुणही सायबर चोरट्यांचे बळी
अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये केवळ साधे नागरिकच नव्हे, तर उच्चशिक्षित व्यावसायिक, आयटी इंजिनीअर आणि गुंतवणुकीत पारंगत व्यक्तीदेखील सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकत आहेत. आकर्षक परतावा, विश्वासार्ह वेबसाइट्सचे भासवलेले क्लोन आणि बनावट गुंतवणूक प्लॅटफॉर्म या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केली जात आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List