ऐन दिवाळीत कामोठावासीयांची पहिली आंघोळ कोरडी, फडणवीस सरकारने पाणी पळवले; नवी मुंबई विमानतळ आणि मॉल्सकडे वळवले
फडणवीस सरकारने पिण्याचे पाणी नवी मुंबई विमानतळ आणि मॉल्सकडे वळवल्याने कामोठावासीयांना हक्काच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. दिवाळीची पहिली आंघोळ कोरडी गेल्याने जनतेत प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
कामोठेतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस उग्र होत चालला आहे. येथील रहिवासी 2010 सालापासून पाण्यासाठी संघर्ष करत आहेत. 25 हजारांहून अधिक लोकसंख्या असूनही स्थानिक लोकप्रतिनिधी कामोठ्यातील पाण्याच्या समस्येकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. त्यामुळे कामोठेवासी चिंतेत आहेत. दिवाळीचा आनंदही त्यांना घेता येत नसल्याचे चित्र आहे.
प्रशांत ठाकूरांच्या कार्यालयावर काढला होता मोर्चा
भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे रहिवाशांनी वारंवार हा प्रश्न मांडला. प्रशांत ठाकूर हे सिडकोचे अध्यक्ष असताना लोकांनी ठाकूर यांच्या कार्यालयावर हंडा मोर्चाही काढला होता. त्यानंतरही हा प्रश्न सुटला नाही. उलट दुसऱयांदा निवडून आल्यानंतर ठाकूर यांनी कामोठय़ाचे पाणी विमानतळ, उच्चभ्रू सोसायटय़ा आणि हॉटेलांकडे वळवण्यासाठी प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे. आमदारच उदासीन असल्याने सिडकोचे अधिकारीही दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
भाजपची सत्ता आणि भाजपचेच आंदोलन
कामोठेतील पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर दोन दिवसांपूर्वी भाजपच्याच लोकांनी मोर्चा काढला. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. राज्यात भाजपची सत्ता आहे आणि कामोठय़ात अनेक वर्षांपासून भाजपचेच आमदार आहेत. येथील पाण्याचा प्रश्न सोडवणे त्यांच्याच हाती आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे पाठपुरावा करणे अपेक्षित आहे. ते करण्याऐवजी भाजपचे कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. ही नौटंकी कशासाठी, असा सवाल स्थानिकांनी केला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List