बाजारात दिवाळीची तेजी कोट्यवधींची उलाढाल
वसुबारस, धनत्रयोदशीपाठोपाठ सोमवारी पहाटे प्रत्येक घराघरात अभ्यंगस्नानचा उत्साह संचारणार आहे. या दिवसापासून खऱया अर्थाने दिवाळी मुक्कामी आल्याचे मानले जाते. त्यामुळे अभ्यंगस्नानच्या पूर्वसंध्येला रविवारी मुंबईकरांनी बाजारात खरेदीसाठी अभूतपूर्व उत्साह दाखवला. दादरच्या रानडे रोड परिसरात हजारो मुंबईकरांनी हजेरी लावली. एकीकडे मंदीचे सावट असतानाही बाजारात दिवाळीच्या तेजीने कोटय़वधींची उलाढाल झाली.
दिवाळी म्हटले की दादरच्या रानडे रोडवर मुंबईकरांची हमखास गर्दी होते. यंदादेखील गर्दीने नवीन उच्चांक नोंदवला. रेल्वे स्थानकाचा पश्चिमेकडील परिसर गर्दीने अक्षरशः फुलून गेला. सुविधा, नक्षत्र, कबुतरखाना, फुल मार्पेट, आयडीयल बुक डेपो, प्लाझा, दादर टीटी, हिंदमाता आदी सर्वच परिसरात खरेदीसाठी हजारो मुंबईकरांनी गर्दी केली होती. कपडे खरेदीसह रेडीमेड दिवाळी फराळ, विद्युत रोषणाई, सजावटीच्या वस्तू, कंदील, पणत्या खरेदी करण्यासाठी दुकानांबाहेर झुंबड उडाली होती. एकीकडे वाढती महागाई, खास-गी क्षेत्रातील रोजगाराचे अस्थिर वातावरण आदी कारणांमुळे मंदीचे सावट चिंता वाढवत आहे. अशा वातावरणातही मुंबईकरांनी दिवाळी खरेदीच्या उत्साहावर त्याचा परिणाम होऊ दिला नाही. अनेकांनी कुटुंबियांच्या पसंतीने खरेदी करण्याचा बेत आखला. त्यामुळे दादर, लालबाग परिसरात आबालवृद्धांची मोठी वर्दळ दिसली. याचे सकारात्मक चित्र बाजारात दिसल्याने व्यापाऱ्यांना दिवाळीची तेजी अनुभवता आली.
गर्दीवर पोलिसांचा वॉच
दादरमध्ये दिवाळीच्या सर्व दिवसांत खरेदीसाठी लगबग सुरू असते. मुंबईकरांच्या खरेदीच्या उत्साहात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, या दृष्टीने पोलिसांनी विशेष सतर्कता बाळगली आहे. पोलीस गर्दीवर लक्ष ठेवण्याबरोबरच वाहतुकीचे चोख नियोजन करीत आहेत.
झेंडूच्या फुलांना मोठी मागणी
रविवारी दादरच्या फुल मार्पेटमध्येही पाय ठेवायला जागा शिल्लक नव्हती. दिवसभरात 20 ते 30 हजार किलो झेंडूची आवक झाली. बाजारात विविध फुलांची विक्री झाली. त्यात झेंडूच्या फुलांना मोठी मागणी होती. झेंडूची प्रतिकिलो भाव 40 ते 80 रुपयापंर्यंत, तर शेवंतीची 50 ते 100 रुपयांपर्यंत विक्री झाली. गेल्या महिन्यात पडलेल्या पावसामुळे फुलांची आवक कमी होत आहे. मात्र भाव स्थिर आहेत. सोमवारी झेंडूच्या फुलांची विक्रमी विक्री होईल, अशी अपेक्षा दादर फुल मार्पेटचे अध्यक्ष दिनेश पुंडे यांनी व्यक्त केली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List