पर्थवर रोहित-कोहलीचा ‘फुसका बार’, ऑस्ट्रेलियाच्या वेगवान वाऱ्यांनी हिंदुस्थानची फलंदाजी उडवली!
आज पर्थवर काही वेगळंच वातावरण होतं. ढगांच्या दरम्यान अपेक्षांचा तडाखा! तब्बल सात महिन्यांनी रोहित शर्मा आणि विराट कोहली पुन्हा वन डे क्रिकेटमध्ये दिसणार म्हटल्यावर स्टेडियममधील प्रत्येक आसन ‘धडाका’ पाहण्यासाठी तयार होतं. पण दुर्दैवाने हा बॉम्ब फुटलाच नाही तर फुसका बार ठरला!
ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी असा वेग आणि अचूकता दाखवली की, रोहित आणि विराट दोघेही ‘वादळा’मध्ये छत्रीशिवाय उभे आहेत की काय, असं वाटावं! शुभमन गिलने कर्णधार म्हणून पदार्पण केलं, पण त्याचा पहिला वन डे ‘डकवर्थ-लुईस’च्या पावसात आणि ऑस्ट्रेलियाच्या गडगडाटात हरवला.
पावसामुळे सामना 26 षटकांचा मर्यादित झाला आणि त्यात हिंदुस्थानने केलेल्या 136 धावा काही फारशी भीती निर्माण करणाऱया नव्हत्या. ऑस्ट्रेलियाने 7 विकेट आणि तब्बल 29 चेंडू राखून सामना जिंकला. मिचेल मार्शने कर्णधारास शोभेल अशी खेळी करत 52 चेंडूंत 46 नाबाद धावा (3 षटकार, 2 चौकार) ठोकल्या आणि ‘मार्श’ला म्हणावं, आज तो ‘विजयाचा शिल्पकार’ ठरला. जोश हेझलवूड, मिचेल स्टार्क, नाथन एलिस आणि मिचेल वोवेन या चौघांनी हिंदुस्थानी फलंदाजांना असा प्रश्न विचारला, ‘तुम्ही फलंदाजी करता का अडथळा शर्यत?’’
रोहित शर्मा केवळ 8 धावांवर झेलबाद झाला. तोही स्लिपमध्ये!
विराट कोहली तर ‘शून्यावर परतला, इतक्या दिवसांच्या प्रतीक्षेनंतर हे काहीसे ‘फ्री ट्रायल’सारखं वाटलं! स्टार्कच्या बाहेर जाणाऱया चेंडू ला ड्राईव्ह करण्याचा मोह आवरला नाही आणि परिणामी कूपर कॉनोलीकडे झेल दिला.
शुभमन गिल थोडा टिकला, पण त्याचं 10 धावांवर यष्टीमागे झेलबाद होणं म्हणजे कर्णधारपदाच्या पदार्पणाला ‘विस्मरणीय’ (तेही चुकीच्या अर्थाने) प्रारंभ. श्रेयस अय्यर (11) ही यष्टीमागे झेलबाद झाला आणि हिंदुस्थानची अवस्था झाली – 5 बाद 84!
अक्षरचा अक्षरशः प्रतिकार
जेव्हा बाकीच्यांनी बॅट हातात धरून ‘तिरंगा’च उडवला होता तेव्हा अक्षर पटेल (31) आणि लोकेश राहुल (38) यांनी थोडी झुंज दिली. दोघांनी ‘गोलंदाजांच्या वाऱयाला’ थोडं आवर घातलं, पण तरीही स्कोअर
136 पार गेला तेवढंच समाधान!
वॉशिंग्टन सुंदर (10), हर्षित राणा (1), अर्शदीप सिंग (0) यांनी एकेक करून बाद होण्याचा सराव केला. शेवटी नितीश कुमार रेड्डी (19 नाबाद) याने थोडं तरी मान राखली, पण त्याने केलेल्या धावांपेक्षा जास्त लोकांनी त्याच्या ‘धैर्याचं काwतुक’ केलं असेल. ऑस्ट्रेलियाकडून हेझलवूड, वोवेन आणि मॅथ्यू कुहनेमन्न यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या, तर स्टार्क आणि एलिसने प्रत्येकी 1-1 विकेट घेत हिंदुस्थानची फलंदाजी ‘सॉर्ट’ करून टाकली.
पर्थचा पाऊस आणि हिंदुस्थानचा पराभव
1983 नंतर पर्थमध्ये पहिल्यांदाच एखादा वन डे पावसामुळे छोटा झाला, पण हिंदुस्थानच्या फलंदाजांसाठी तो सामना ‘थोडकाच नव्हे तर लहान स्वप्नच’ ठरला. ऑस्ट्रेलियाने सुधारित 131 धावांचे लक्ष्य 21.1 षटकांतच गाठले, 3 बाद 131! मिचेल मार्श (46 नाबाद) आणि मॅट रॅनशॉ (21 नाबाद) यांनी रन मशीन सुरू ठेवत विजयावर शिक्कामोर्तब केले.
हिंदुस्थानकडून अर्शदीप सिंग, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली, पण त्यांची ती विकेटही ‘उत्तेजनार्थ पुरस्कार’च ठरले. आजचा सामना म्हणजे अपेक्षांचं महापर्व आणि वास्तवाचं थंड पाणी!
रोहित आणि विराटच्या बॅटमधून ठिणग्या उडतील असं वाटलं होतं, पण फटाके ओले निघाले. शुभमनच्या कर्णधारपदाला ‘डकवर्थ-लुईस’ने बुडवून टाकलं आणि ऑस्ट्रेलियाने दाखवलं-क्रिकेटमध्ये नाव नव्हे, ‘लाइन आणि लेंथ’ जिंकते! तसेच पर्थच्या वाऱयांनी सांगितलं, जिथे अपेक्षा मोठय़ा तिथे निराशासुद्धा चौकारासारखी उडते!
फास्ट अॅण्ड फ्युरियस ऑस्ट्रेलियन गोलंदाजी
ऑप्टसच्या दमट हवेने आधीच फलंदाजांना त्रास द्यायला घेतलं होतं आणि वरून ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी अशी फायरिंग लाइन लावली की, प्रत्येक हिंदुस्थानी फलंदाज गोंधळात पडला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List