Why Women Feel Colder : गारवा वाढला की लगेच कुडकुडतात… पुरूषांपेक्षा स्त्रियांना जास्त थंडी का वाजते ?
ऑफीसमध्ये काम करताना असो किंवा रेस्टॉरंटमध्ये जेवण असो अथवा थिएटरमध्ये चित्रपट पाहणं असो, एसीचा झोत वाढला कि लगेच अंगावर शहारा येतो. त्यातही तिथल्या पुरूषांपेक्षा स्त्रियांना पटकन थंडी वाजते, जास्त गार वाटतं. पण पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना, महिलांना जास्त थंडी का वाजते, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का ? खरंतर त्यामागे एक वैज्ञानिक कारण आहे. या फरकात भौतिक आणि रासायनिक घटकांचा वाटा आहे. हे का घडते आणि त्याची कारणे काय आहेत ते जाणून घेऊया.
शरीर विश्रांती घेत असताना किंवा हालचाल करत असताना मसल्स टिशू उष्णता निर्माण करतात. महिलांमध्ये सामान्यतः पुरुषांपेक्षा कमी मसल्स असतात, त्यामुळे त्यांचे शरीर एकूणच कमी उष्णता निर्माण करते.
प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजेन सारखे हार्मोन्स रक्ताभिसरण आणि तापमान नियंत्रित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. प्रोजेस्टेरॉन हे रक्तवाहिन्या आकुंचन करू शकते, ज्यामुळे हातपायांमध्ये रक्त प्रवाह कमी होतो. हात आणि पायांमध्ये रक्तप्रवाह कमी झाल्यामुळे थंडी वाजू शकते.
चयापचय प्रक्रियेमुळे अर्थात मेटाबॉलिज्ममुळे अन्नाचे उर्जेमध्ये रूपांतर होते आणि या प्रक्रियेत उष्णता निर्माण होते. महिलांचा चयापचय दर पुरुषांपेक्षा कमी असतो. याचा अर्थ त्यांचे शरीर कमी कॅलरीज बर्न करते आणि विश्रांतीच्या वेळी कमी उष्णता निर्माण करते.
पुरुषांपेक्षा महिलांमध्ये चरबीचे प्रमाण जास्त असते. ही चरबी उष्णता कमी होण्यापासून रोखण्यासाठी एक इन्सुलेटर म्हणून काम करते, परंतु स्नायूंसारखी उष्णता निर्माण करत नाही.
महिलांच्या शरीराच्या आकारमानाच्या तुलनेत त्यांचा सरफेस जास्त असतो. याचा अर्थ त्या त्यांच्या सभोवतालची उष्णता जलद गमावतात, ज्यामुळे त्यांच्या शरीराचे तापमान राखणे कठीण होते.
शरीरातील काही रसायने, उदा. थायरॉईड हार्मोन, मेटाबॉलिज्म आणि हीट प्रोडक्शन नियंत्रित करतात. महिलांमध्ये संवेदनशीलतेचे प्रमाण थोडे वेगळे असू शकते, ज्यामुळे त्यांच्या शरीराची उष्णता निर्माण करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. कमी थायरॉईड क्रियाकलाप किंवा मंद मेटाबॉलिज्म यामुळे महिलांना सहजपणे थंडी जाणवू शकते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List