टेकऑफचा मुहूर्त अखेर ठरला; 8 ऑक्टोबरला नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन, एअरोड्रोम लायसन्स मिळाले
सुमारे अर्धा डझन डेडलाईनने हुलकावणी दिल्यानंतर आता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून टेकऑफचा मुहूर्त अखेर ठरला आहे. विमानतळाचे उद्घाटन येत्या 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असून त्यानंतर सुमारे दीड महिन्याने नवी मुंबईतून विमान सेवा सुरू होणार आहे. गौतम अदानी यांनी आज नवी मुंबई विमानतळाला भेट देऊन कामाचा आढावा घेतला आणि अधिकाऱयांशी चर्चा केली. दरम्यान, आजच नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने एअरोड्रोम परवाना दिल्याने उद्घाटनामधील अडसर दूर झाला आहे.
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन 30 सप्टेंबर रोजी होणार होते. मात्र राज्य सरकार, सिडको आणि अदानी समूहाने कोणतेही स्पष्टीकरण न देता पुढे ढकलले. उद्घाटनाची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली येथे चार दिवसांपूर्वी केली होती. उद्घाटन 8 किंवा 9 ऑक्टोबर रोजी होणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र प्रशासनाने 8 ऑक्टोबर ही तारीख निश्चित केली असल्याची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे. अदानी एअरपोर्ट होल्डिंग कंपनी किंवा सिडकोकडून या तारखेबाबत अधिकृत घोषणा अद्यापही करण्यात आलेली नाही. मात्र उद्घाटनाची तयारी सर्वच यंत्रणांनी सुरू केली आहे. अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी आज नवी मुंबई विमानतळाला भेट दिली. अदानी यांनी सर्व विमानतळ साईटची पाहणी करून कामाचा आढावा घेतला.
नोव्हेंबरपासून विमान सेवा सुरू होणार
सीआयएसएफला या विमानतळावर सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी दीड महिन्याचा कालावधी लागेल. त्यानंतर प्रथम देशांतर्गत विमान सेवा सुरू होईल. नोव्हेंबरच्या दुसऱया आठवडय़ापासून विमानतळ प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List