पोलीस डायरी – लाचखोरांनो, कुटुंबाची तरी अब्रू राखा! 9 महिन्यांत 125 पोलीस सापळ्यात!
>> प्रभाकर पवार, [email protected]
मुंबईच्या पूर्व उपनगरातील वडाळा ट्रक टर्मिनस या पोलीस ठाण्याचे ५२ वर्षीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत सुधाकर सरोदे व त्यांचे ३७वर्षीय सहकारी उपनिरीक्षक राहुल रमेश वाघमोडे हे वरळीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांकडून लाच घेताना शुक्रवार दि. २६ सप्टेंबर रोजी रंगेहाथ पकडले गेले. चंद्रकांत सरोदे यांना २ लाख, तर फौजदार राहुल वाघमोडे यांना २० हजारांची लाच घेताना अटक करण्यात आली. गेल्या वर्षभरात शिवाजी नगर, टिळक नगर व वडाळा ट्रक टर्मिनस पोलीस ठाणे चालविणारे तीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक लागोपाठ लाच घेताना रंगेहाथ पकडले गेले. निवृत्ती जवळ आलेली असताना असे जबाबदार अधिकारी पैशांच्या मोहाला का बळी पडतात याचे आश्चर्य वाटते.
वडाळा ट्रक टर्मिनसचे वरिष्ठ निरीक्षक व फौजदारांविरुद्ध तक्रार करणारा हा एक सामाजिक कार्यकर्ता आहे. त्याच्या विरोधात वडाळा ट्रक टर्मिनस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. आपल्या मुलीविरुद्धही गुन्हा दाखल करू, अशी धमकी फौजदार राहुल वाघमोडे याने वरिष्ठ निरीक्षकांच्या वतीने त्या सामाजिक कार्यकर्त्याला दिली. मुलीवर कारवाई न करण्यासाठी व समोरच्या गटातील व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यासाठी ४ लाख ३० हजारांची मागणी या पोलिसांकडून केली गेली होती. वरिष्ठ निरीक्षकास ४ लाख व फौजदारास ३० हजार अशी रक्कम देण्याचे ठरले होते, परंतु हा दुःखी, कष्टी सामाजिक कार्यकर्ता वरळीच्या अॅन्टीकरप्शनच्या कार्यालयात धडकला. वडाळा टीटीच्या वपोनि व त्याच्यासाठी हप्ता गोळा करणाऱ्या फौजदाराविरुद्ध लाच मागितल्याची तक्रार त्याने केली. अॅन्टीकरप्शनच्या अधिकाऱ्यांनी त्याची खातरजमा केली असता त्यात तथ्य आढळले तेव्हा अॅन्टीकरप्शनच्या अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्याजवळच सापळा रचला. दोघेही अधिकारी अगदी सहज अॅन्टीकरप्शनच्या जाळ्यात लाच घेताना पकडले गेले. सामान्यांसमोर डरकाळ्या फोडणाऱ्या या नकली वाघांच्या (अॅन्टीकरप्शनच्या अधिकाऱ्यांना पाहून) क्षणांत शेळ्या झाल्या. त्यांना अटक करण्यात आल्यानंतर त्यांच्या घराची झडती घेण्यात आली याचा त्यांच्या कुटुंबीयांना धक्का बसला. कुटुंबीयांनी इतके वर्षे जपलेली पोलिसी प्रतिमा एका क्षणात धुळीला मिळाली. पोलिसांनीच पोलिसांच्या (लाचखोर) घरात छापा मारला. (अॅण्टी करप्शनवालेही पोलीसच असतात) असे आज महाराष्ट्रभर रोज सुरू आहे. लाचखोर पोलिसांमुळे त्यांच्या कुटुंबीयांना समाजात
उजळ माथ्याने फिरणे आता मुश्कील झाले आहे.
गेल्या ९ महिन्यांत (१ जानेवारी ते २४ सप्टेंबरपर्यंत) मुंबईसह महाराष्ट्र पोलीस दलातील १२५ पोलिसांना लाच घेताना अटक करण्यात आली आहे. त्याच्या दुप्पट गेल्या ९ महिन्यांत महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी गजाआड झाले आहेत, परंतु पोलिसांच्या खाकी वर्दीमागे ‘ग्लॅमर’ असल्याने ते आज जास्त बदनाम आहेत. एका साध्या शिपायाने जरी शंभर-दोनशे रुपये स्वीकारले तरी त्याची ठळक बातमी होते, परंतु महसूल किंवा अन्य कोणत्याही राजपत्रित अधिकाऱ्याच्या घरात लाखोंचे घबाड सापडले तरी ती बातमी बऱ्याचदा छापली जात नाही. ती दुर्लक्षित केली जाते.
अंगावर वर्दी चढविण्यासाठी अनेक तरुण रात्र-रात्र जागून अभ्यास करतात. मेहनत करतात. रनिंगमध्ये पहिला क्रमांक येण्यासाठी जीव तोडून धावतात. निवड झाल्यावर, स्वप्न प्रत्यक्षात पूर्ण झाल्यावर मात्र घेतलेल्या आणाभाका ते पैशांसाठी विसरून जातात. ‘सदरक्षणाय खलनिग्रहणायला तिलांजली देतात. त्यामुळेच दर एक दिवस आड करून मुंबईसह महाराष्ट्रात एक तरी पोलीस लाच घेताना रंगेहाथ पकडला जात आहे. ही बाब अत्यंत चिंतनीय आहे. लाच घेताना पकडल्यानंतर अॅन्टीकरप्शनवाले लाचखोर अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी सुरू करतात. नामी-बेनामी अशा गुप्त संपत्तीचा शोध घेतात. ही चौकशी अनेक महिने सुरू असते. तोपर्यंत लाचखोर लोकसेवक व त्याचे कुटुंबीय जेरीस आलेले असतात. त्याची जनमानसात बदनामी झालेली असते. लोक त्यांची उपेक्षा करतात. तेव्हा पैशांचा मोह तुम्हाला आयुष्यातून उठवितो हे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे. पोलीस दलातील भ्रष्टाचार हा अत्यंत नगण्य आहे. गेल्या ९ महिन्यांत इतर ७५८ लोकसेवकांना लाच घेताना अटक करण्यात आली आहे, परंतु ‘जळीस्थळी’ लोकांना पोलीसच दिसतो हे मात्र खरे आहे. कारण तो ‘सॉफ्ट टार्गेट’ आहे. तो चुकला तर त्याला माफी नसते. त्याला कसेही हाणता येते. आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करता येते.
पूर्वी पोलिसांचा प्रचंड दरारा होता. पोलिसांविरुद्ध तक्रार करायला कुणी सहसा धजत नसत, परंतु आता काळ व पिढी बदलली आहे. पोलिसांची कोणतीही चूक आता खपवून घेतली जात नाही. पैशांचे ‘डिमांड’ तर आता विसरूनच जा. एका लेखी तक्रारीवर तुमची चौकशी होऊन तुमची उचलबांगडी होऊ शकते. हे सर्व माहीत असतानाही वडाळा टीटीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बिनधास्तपणे ४ लाखांच्या लाचेची मागणी करतात, याला काय म्हणावे? आज स्वतःची व कुटुंबीयांची चंद्रकांत सरोदे यांनी प्रतिष्ठा धुळीला मिळविली आहे. मुंबई पोलिसांनाही त्यांनी बदनाम केले आहे. पोलिसांना आता व्यवस्थित चांगले दरमहा लाखभर वेतन आहे. निवृत्त झाल्यावरही वरिष्ठ निरीक्षकाला किमान ७५ ते ८५ हजार निवृत्ती वेतन मिळते. तरीही पोलिसांना अधिक पैसे जमा करायची लालसा का? लाच घेताना आपण पकडले गेलो तर आपली छीथू होईल, आपल्या कुटुंबीयांना समाजात फिरणे मुश्कील होईल याचे तरी लाचखोर पोलिसांनी भान ठेवले पाहिजे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List