मुंबईची लाइफलाइन कोलमडली; मध्य, हार्बर मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांना मनस्ताप
मुंबई आणि उपनगरात गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. शुक्रवारपासून मुंबईच्या आकाशात ढगांची गर्दी झालेली दिसत असून काही ठिकाणी मुसळधार, तर काही ठिकाणी पावसाच्या मध्यम सरी कोसळल्या. याचा परिणाम मुंबईची लाइफलाइन समजल्या जाणाऱ्या लोकल सेवेवर झाला आहे. पावसाची रिपरिप सुरू असल्याने अनेक ठिकाणी रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. अनेक गाड्या वेळेपेक्षा उशिरा धावत असून यामुळे प्रवाशांना मनस्ताप झाला. सकाळच्या सुमारास कार्यालयीन कामकाजासाठी घराबाहेर पडलेल्या चाकरमान्यांना लेटमार्क मिळाला.
मुंबईत शुक्रवार रात्रीपासून पावसाचे धुमशान सुरू आहे. मुंबई शहर, उपनगर, नवी मुंबई, ठाणे, रायगडमध्ये पावसाने चांगलाच जोर पकडला आहे. हवामान विभागाने मुंबईसह कोकणाला आज ऑरेंज अलर्ट जारी केला असून सतत कोसळणाऱ्या पावसाचा थेट परिणाम लोकल सेवेवर झाला आहे. मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल उशिराने धावत आहेत. अनेक लोकल अत्यंत धीम्या गतीने पुढे सरकत आहेत, तर काही ट्रॅकवर थांबल्या. त्यामुळे प्रवाशांनी रेल्वे ट्रॅकवर चालत जाऊन जवळचे स्थानक गाठले.

हार्बर मार्गावरून पनवेल स्थानकावरून 5.40 वाजता सुटणारी पनवेल ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल लोकल रखडली आहे. मानखुर्द स्थानकापासून गाडी धीम्या गतीने मध्ये थांबत थांबत पुढे सरकत आहे. नेहमी 6.30 च्या आसपास कुर्ला स्थानकाला पोहोचणारी ही गाडी आज तब्बल एक तास उशिराने कुर्ला स्थानकावर पोहोचली. यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List