हनीट्रॅपचे धागेदारे समृद्धीच्या भ्रष्टाचारापर्यंत पोहोचलेले आहेत म्हणूनच सरकार चौकशी करत नाही; हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाने जनतेला काय दिले तर ‘राजा उदार झाला आणि हाती भोपाळा दिला’, असेच म्हणावे लागेल. राज्यात गुन्हेगारी वाढली आहे, महिला सुरक्षित नाहीत, ड्रग्जचा सुळसुळाट जोरात सुरु आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, कर्जमाफी, पीकविमा, बेरोजगारी यातील एकाही प्रश्नावर ना सविस्तर चर्चा झाली ना काही निर्णय. हे अधिवेशन लक्षात राहिल ते फक्त विधानभवनाच्या इमारतीत झालेल्या तुंबळ हाणीमारीच्या घटनेने. रस्त्यावरील गुंड, मवाली आता थेट विधानभवनात घुसले आणि त्याला फक्त आणि फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच जबाबदार आहेत, असा गंभीर आरोप करत फडणवीसांनी प्रायश्चित म्हणून राजीनामा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, विधीमंडळ अथवा संसदेत जनता आपले लोकप्रतिनिधी पाठवते ती त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पण अलिकडे हे चित्र बदलत चालले असून महाराष्ट्राच्या जनतेने यावेळी असे चित्र पाहिले जे आजपर्यंत या लोकशाहीच्या पवित्र मंदिरात घडले नाही. कालपर्यंत जे रस्त्यावर होत होते ते आज लोकशाहीच्या पवित्र मंदिरात घडले. जणू WWF च सुरु झाले आहे अशीच ही घटना होती. जे घडले त्याची निंदा करावी तेवढी कमीच आहे पण ही घटना घडण्यास राज्याचे मुख्यमंत्रीच जबाबदार आहेत. भाजपाने ही नवी संस्कृती जाणीवपूर्वक आणली आहे.
अक्कलकोटमध्ये प्रविण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या मकोकाच्या गुंडाला भाजपाचे नेतेच ‘भिवू नकोस मुख्यमंत्री तुझ्या पाठीशी आहेत’ असे सांगत आहेत. तर आमदार निवासाच्या कँन्टीनमध्येही एका आमदाराने असेच WWF केले. आका, कोयत्या गँग आता जुने झाले. आमदारांना मवाली म्हटले जाते असे मुख्यमंत्री म्हणतात, हे भाजपाने जे पेरले तेच उगवले आहे. आणि हा डाव आता भाजपावरच उलटत आहे असेही सपकाळ म्हणाले.
महाराष्ट्राच्या विधिमंडळात जे झाले त्याने जनतेत प्रचंड संताप आहे पण हे सत्तेच्या पिंडीवर बसलेले विंचू आहेत त्यांना ठेचायची सोय नाही. भाजपाने लोकशाही रसातळाला आणून ठेवली आहे. भाजपाला लोकशाही व संविधान मान्य नाही पण संस्कृती व परंपरा बुडवण्याचे पाप तरी करू नका. महाराष्ट्राच्या जनतेच्या अंत पाहू नका जनता याचा हिशोब नक्की करेल असा इशाराही प्रदेशाध्यक्षांनी दिला,
हनीट्रॅपचे धागेदारे समृद्धीच्या भ्रष्टाचारात
राज्यातील काही अधिकारी व मंत्री हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकले आहेत हे सत्य आहे. मुख्यमंत्री जरी असे काही घडलेले नाही असे म्हणत असले तरी ते नेहमीप्रमाणे खोटे बोलत आहेत. या हनीट्रॅपचे धागेदोरे समृद्धी महामार्गातील 20 हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचारापर्यंत पोहोचलेले आहेत. हा घोटाळा उघड होऊ नये म्हणून तो दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे, फडणवीस जे बोलले ते धादांत खोटे आहे, असेही सपकाळ म्हणाले.
जनसुरक्षा कायद्यावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, काँग्रेस पक्षाने सुरुवातीपासून यावर हरकत घेतलेली असून काँग्रेसचा या विधेयकाला विरोध आहे. या विधेयकासाठी नियुक्त केलेल्या समितीतही अनेक आक्षेप घेण्यात आले आहेत. बजरंग दल, आरएसएस या संघटनाही या कायद्याच्या कक्षेत येतात का, असा मुद्दाही उपस्थित करण्यात आला होता त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार काही बोलत नाहीत, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले. काँग्रेसचा या विधेयकाला विरोध आहे आणि विधिमंडळाच्या आत व बाहेरही विरोधच राहिल असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी ठामपणे सांगितले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List