उजनीतून विसर्ग घटला; पंढरीतील पुराचे संकट टळले
उजनी धरणातून सुरू असलेल्या विसर्गामध्ये घट करण्यात येत आहे. त्यामुळे पंढरपूर येथे इशारा पातळीवरून धोक्याच्या पातळीकडे मार्गक्रमण करणाऱ्या चंद्रभागा नदीचा विसर्ग कमी होऊ लागला आहे. यामुळे चंद्रभागेचा पंढरपूर येथील पुराचा धोका सध्यातरी टळला आहे. यामुळे व्यास नारायण झोपडपट्टी येथील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
नीरा व भीमा खोऱ्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नीरा व उजनी धरण 98 टक्के भरले आहे. उजनी धरणामधून भीमा नदीत 71 हजारांचा, तर वीर धरणातून 30 हजारांचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. मात्र, बुधवारी पहाटे उजनीतून 10 हजारांचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. त्यामुळे पंढरपूर येथे सुरू असलेला 90 हजारांचा विसर्ग कमी होऊन 80 हजारांवर आला आहे. त्यामुळे सध्यातरी पंढरपूर येथील संभाव्य पुराचा धोका टळला आहे. असे असले तरी पंढरपूर येथे भीमा (चंद्रभागा) इशारा पातळीवरून वाहत आहे. त्यामुळे चंद्रभागा वाळवंटातील भक्त पुंडलिक मंदिरासह इतर मंदिरे पुराच्या पाण्यात अर्धी बुडाली आहेत. मंदिरांना पाण्याचा वेढा कायम आहे. तर कोल्हापूर पद्धतीचे उंबरे, आव्हे, पटवर्धन कुरोली, गुरसाळे, पंढरपूर, विष्णूपद, अजनसोंड, बठाण हे आठही बंधारे पाण्याखाली आहेत. तेथील वाहतूक तीन दिवसांपासून बंदच आहे. नदीकाठच्या गावांमध्ये प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, सकाळपासून नदीपात्रातील पाणी कमी होऊ लागले आहे. त्यामुळे चंद्रभागा नदीकाठच्या व्यासनारायण झोपडपट्टीत पाणी शिरण्याची भीती कमी झाली आहे.
सुरक्षारक्षक तैनात करणे गरजेचे!
सध्या चंद्रभागा नदी इशारा पातळीवरून वाहत आहे. सर्व बंधारे पाण्याखाली आहेत. घटांवर पाणी आले आहे. मात्र, तरीदेखील भाविक नदीपात्रात उतरून स्नान करताना दिसून येतात. पाण्याला वेग असून, भाविक वाहून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जीवितहानी टाळण्यासाठी पंढरपूर परिसरात चंद्रभागा नदीकाठी सुरक्षारक्षक तैनात करणे गरजेचे आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List