शेतकरी आंदोलनाचा भडका; नागपुरात रेल रोको, नेते रस्त्यावर झोपले! आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी आणि कामगारांच्या 22 प्रलंबित मागण्यांसाठी हजारो शेतकऱयांचे नागपूरमध्ये आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा आज भडका उडाला. आंदोलकांनी चार महामार्गांसह रेल्वे मार्गावरही ठिय्या दिला. रस्त्यावर टायर जाळून वाहतूक बंद करण्यात आली. शेतकरी नेते तर आंदोलकांसह रस्त्यावरच झोपले. रेल रोकोही करण्यात आला. दरम्यान, सरकारकडून दोन राज्यमंत्र्यांनी आंदोलकांशी रात्री चर्चा केली. यावेळी शेतकरी कर्जमाफीवर ठाम राहिल्याने उद्या मुंबईत आंदोलक प्रतिनिधी आणि मुख्यमंत्र्यांमध्ये बैठक होणार आहे. मात्र आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
‘प्रहार’चे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी कर्जमाफी, हमीभाव आणि शेतकरी, मेंढपाळ, मच्छीमार आणि इतर क्षेत्रांत काम करणाऱया कामगारांना न्याय मिळावा यासाठी आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनात हजारोंच्या संख्येने शेतकऱयांनी सहभाग घेत कर्जमुक्तीसाठी रस्त्यावरच ठिय्या मांडला आहे. बच्चू कडू यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी, वामनराव चटप, रासपचे प्रमुख महादेव जानकर शेतकऱयांसोबत रात्रभर रस्त्यावरच झोपले. आंदोलनाला तब्बल 27 तास उलटूनही सरकारने दखल घेतली नाही. अखेर रात्री उशिरा सरकारकडून राज्यमंत्री पंकज भोयर आणि आशीष जयस्वाल यांनी आंदोलनस्थळी जात बच्चू कडूंसह शेतकरी नेत्यांशी चर्चा केली, मात्र ही चर्चा निष्फळ ठरली. कर्जमुक्ती किती दिवसांत करणार अशी ठाम मागणी यावेळी लावून धरण्यात आली. त्यावर उद्या मुख्यमंत्री फडणवीस हे बैठक घेतील, असे आश्वासन देण्यात आले. बैठकीला बच्चू कडू व प्रमुख शेतकरी नेते उपस्थित राहतील.
अशा आहेत मागण्या
- शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या.
- कृषिमालाला हमी भावावर 20 टक्के अनुदान.
- घरकुलाला समान निकष लावून 5 लाख अनुदान द्यावे.
- पेरणी ते कापणीचा सर्व खर्च करावा.
- नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा.
- दिव्यांग, निराधार, विधवा भगिनी व अनाथांना मासिक 6 हजार रुपये मानधन मिळावे.
- मेंढपाळ व मच्छीमार यांच्यासाठी स्वतंत्र धोरण तयार करून त्यांचे प्रश्न मार्गी लावावेत.
- ग्रामपंचायत कर्मचाऱयांच्या वेतनाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावावा.
न्यायालयाच्या आदेशानंतर जागा बदलली; आंदोलन सुरूच
हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने 6 वाजेपर्यंत आंदोलन स्थळ सोडण्याचे निर्देश आंदोलकांना दिले. यावर, आम्ही न्यायालयाचा आदर करतो. आम्हाला शेतकरी हक्कांसाठी बोलल्याबद्दल गुन्हा नोंदवून अटक करावी, जेलमध्ये टाकावे आणि रस्ता मोकळा करून घ्यावा, असा संताप बच्चू कडू यांनी व्यक्त केला. त्याचवेळी आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार त्यांनी केला. मिस्टर फडणवीस, तुमचा बिस्तरा गुंडाळणार – जानकर
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुरुवात केली आहे, पण शेवट आम्ही करू. सरकार बदलल्याशिवाय देवेंद्र आम्ही तुम्हाला शांत बसू देणार नाही. सरकारच्या माध्यमातून, कोर्टाच्या माध्यमातून तुम्ही डाव टाकताय. पण ‘मिस्टर फडणवीस तुमचा बिस्तरा गुंडाळल्याशिवाय आम्ही राहणार नाही’, असा इशारा माजी आमदार महादेव जानकर यांनी मुख्यमंत्र्यांना दिला.
आम्ही न्यायालयाच्या आदेशांचा अवमान करणार नाही. मात्र आंदोलक आंदोलन सुरू ठेवण्यावर ठाम राहिले तर आंदोलन सुरूच राहील. हा लोक न्यायालय आणि विधी न्यायालय यामधील संघर्ष आहे. आम्ही जेलभरोसाठी तयार आहोत. पोलिसांनी जेलभरोसाठी तयार रहावे. – बच्चू कडू, शेतकरी नेते
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List