मुख्यमंत्र्यांकडे हनी ट्रॅपचे सगळे पुरावे आहेत तरी ते महाशय गप्प का बसले आहेत? संजय राऊत यांचा सवाल
हनी ट्रॅपमध्ये फडणवीसांचीच माणसं अडकलेली आहेत असा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सीडी, पेनड्राईव्हसह सर्व पुरावे आहेत, तरी ते महाशय गप्प का बसले आहेत? असेही फडणवीस म्हणाले.
दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री आहेत. त्याचं खातं फक्त सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांविरोधात अडकवण्यासाठीच आहे. त्या नर्तिकेवर गोळीबार करणारा आमदाराचा भाऊ अजून सापडलेला नाहिये. गुन्हे दाखल करून सोडून दिले आहे. पण त्याच वेळेला शिवसेनेचे शहरप्रमुख किरण काळे यांच्यावर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल केला आहे. का त्यांनी अहिल्यानगरमधला रस्त्याचा 400 कोटी रुपयांचा घोटाळा समोर आणला. आमदार संग्राम जगताप यांचा आयआयटी पार्कचा घोटाळा त्यांनी समोर आणला. पहाटे तीन वाजता बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. पहाटे तीन वाजता आमच्या कार्यकर्त्याकडे पोहोचता, पण त्या नर्तिकेवर गोळी घालून त्या बाईला जखमी केलं, ती बाई मृत्यूशी झुंज देत आहे पोलिस त्याला पकडू शकले नाहीत, ही या राज्याची अवस्था आहे. विरोधकांना दाबण्यासाठी फक्त तुमचा कायदा आहे. हर्षल पाटीलच्या गुन्हेगारांना तुम्ही अटक करणार का? हर्षल पाटीलचा हा खून आहे. सरकारकडे पैसे नसतील तर कामं देतात कशाला? एक कोटी 40 लाख नसतील तर कामं काढता कशाला, मंत्र्यांना कमिशन खाण्यासाठी? सगळे मंत्री कमिशनखोर आहेत, चार मंत्री हनीट्रॅपमध्ये अडकले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सगळे पुरावे आहेत. सीडी आणि पेनड्राईव्हसह. तरी हे महाशय गप्प का बसले आहेत. त्यांचे काय हात अडकले आहेत का? नुसते चेहऱ्यावर खोटे हास्य घेऊन भाषणं करून फिरत आहेत. तुम्ही त्या गडचिरोलीला स्टील सिटी करत आहेत पण महाराष्ट्र पोकळ होतोय तो बघा ना असेही संजय राऊत म्हणाले.
हनी ट्रॅपमध्ये फडणवीसांचीच माणसं अडकलेली आहेत. त्यांचेच संकटमोचक अडकलेले आहेत. मी कुणाचंही नाव घेतलेलं नाहिये. मी चार मंत्र्यांची नावं सांगतोय. पण इतर अनेकजण आहेत त्यांच्यापैकी. आख्खा भाजपचा गोतावळा त्यात अडकला आहे. म्हणून मी स्पष्ट सांगितले होतं की आमचे चार खासदार हनी ट्रॅपमध्ये अडकले होते आणि ते सोडून गेले. आमचे तरुण आणि शक्तिमान समजले जाणारे खासदार हे त्यांनी हनीट्रॅपमध्ये व्यवस्थित अडकवले आणि त्यांना शिवसेना सोडायला भाग पाडलं असे संजय राऊत म्हणाले.
पोलीस हे भाजपच्या कार्यकर्त्यांसारखं काम करत आहे. पोलीस हे गृहखात्याच्या अधीन राहून फडणवीस आपली खासगी कामं करून घेत आहेत. हे जर कुणी विरोधी पक्षाचा असता तर देवेंद्र फडणवीस यांनी स्क्रीन लावून सगळं सांगितलं असतं. पण आता त्यांची लोकं आहेत. महाराष्ट्राची बेअब्रू होत आहे. दिल्लीच्या काय फेऱ्या मारताय. दिल्लीचे सरकार हे औटघटकेचं सरकार आहे असेही संजय राऊत म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List