बारामतीत नीरा कालव्याला भगदाड; घरांमध्ये पाणी शिरले, शेतपिकांचे नुकसान
बारामती तालुक्यातील लिमटेक परिसरात नीरा डावा कालवा फुटल्याची घटना घडली आहे. कालव्यात मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने कालवा फुटून हे पाणी घरांमध्ये, तसेच शेतांत शिरले आहे. गेल्या तीन दिवसांपासून बारामती, पिंपळी, लिमटेक, काटेवाडी परिसरांत झालेल्या मुसळधार पावसामुळे ओढे-नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. हे पाणी कालव्यात शिरल्याने पाण्याच्या वाढलेल्या दाबामुळे नीरा डाव्या कालव्याला लिमटेकजवळ भगदाड पडले आहे.
पुणे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल यांनी दिलेल्या माहितीनुसार, कालव्यातील वहनक्षमता अचानक वाढल्याने ही घटना घडली. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे कालव्यातील पाण्याचा प्रवाह नियंत्रित करण्यास अनेक अडचणी आल्या. या घटनेत शेतजमिनींचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
कालव्याची दुरुस्ती करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. खबरदारीच्या पाश्र्वभूमीवर ‘एनडीआरएफ’ची दोन पथके बारामतीच्या दिशेने रवाना झाली आहेत. सध्या तेथील परिस्थिती नियंत्रणात असून, रात्रीची स्थिती पाहून पथकांना तेथून हटविले जाईल, अशी माहिती ‘एनडीआरएफ’चे असिस्टंट कमांडंट यांनी दिली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List