मोदी-शहांना फक्त विरोधी पक्ष फोडता येतात, त्यांच्यात पाकिस्तान तोडण्याची हिंमत नाही; संजय राऊत यांची जोरदार टीका
पंतप्रधान मोदींनी अदानीच्या बाबतीत अमेरिकेशी सौदा केला, असा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. तसेच मोदी – शहांना फक्त विरोधी पक्ष फोडता येतात, त्यांच्यात पाकिस्तान तोडण्याची हिंमत नाही असा घणाघातही संजय राऊत यांनी केला.
आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, ट्रम्प यांनी हिंदुस्थान पाकिस्तानच्या शस्त्रसंधीची घोषणा केली. ही बाब देशाच्या सार्वभौमत्वासाठी बेअब्रू करणारी आहे. व्यापाराबाबत तुम्ही ट्रम्पशी चर्चा करणार आणि पाकव्याप्त कश्मीरबाबत. पण त्यासाठीही ट्रम्पसोबत चर्चा करावी लागणार, जर ट्रम्प यांनी परवानगी दिली तरच तुम्ही चर्चा करणार. ही बाब जवळजळ सिद्ध झाली आहे की, हा देश ट्रम्प चालवत आहेत. या देशात व्यापाऱ्यांचे राज्य सुरू आहे. पण एक आंतरराष्ट्रीय व्यापारी इथल्या व्यापाऱ्यांना नियंत्रित करत आहेत. मी युद्ध थांबवलं ही घोषणा ट्रम्प यांनी वॉशिंग्टनमधून का केली? काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या निवेदनात या घटनेचा उल्लेखही नाही. आपल्या आधी ट्रम्प भाषण करतात. आणि ट्रम्प तुमच्या भाषणाची लक्तरं काढतात. मोदींचे मित्र भाषण करून सांगतात की मी भारत पाकिस्तान युद्ध थांबवलं आणि त्यात मोदींचे नावही घेत नाही. भारत देश जणू काय ट्रम्पचा गुलाम आहे अशा भाषेत ते बोलत होते. त्यानंतर मोदींनी जे संबोधन केले त्यात ते असे नाही म्हणाले की आम्ही अमेरिकेच्या नादी नाही लागलो. शस्त्रसंधीचा निर्णय आमचा आहे, कोण आहे ट्रम्प असे मोदी नाही म्हणाले. याच ट्रम्पला मोदींनी घोडीवर बसवून नवरदेव बनवून अहमदाबादला आणलं होतं. त्याच ट्रम्पने हिंदुस्थानचा अपमान केला. याबाबत मोदींच्या अंधभक्तांकडे उत्तर आहे का? असे संजय राऊत म्हणाले.
गृहमंत्री अमित शहा पंडित नेहरुंचा दाखल देत म्हणत होते की आमच्या फौजा पंजाबपर्यंत गेली होती. संपूर्ण कश्मीर घेण्यापूर्वीच युद्ध थांबवलं. तर आमचे हवाई दलही लाहोर आणि कराचीपर्यंत गेले होते. आमचे नौदल समुद्रात उभं होतं. लाहोक आणि कराची ताब्यात घेणार होते मग का नाही घेतले? आमचा प्रश्न आहे की ट्रम्पसोबत काय सौदा झाला आहे? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.
व्यापार देशापेक्षा मोठा नाही. देशातल्या नागरिकांचे हकनाक बळी गेले आहेत. ऑपरेशन सिंदूर राबवलं, पण त्या कुंकवाचं महत्त्व काय? कुंकवाच्या ताकदीपुढे व्यापार येत नाही. व्यापार करण्यासाठी फक्त अमेरिका नाहीये, संपूर्ण जाग बाकी आहे. डोनाल्ड ट्रम्प या जगाचे अंडरवर्ल्ड डॉन आहेत, हे डॉन छोट्या छोट्या गुंडांना नियंत्रित करत आहेत.
पवारांनी नाराजी व्यक्त केली असेल खुल्या पद्धतीने करावी. पवारांनी सरकारचे समर्थन केले आहे आम्ही नाही. या सरकारची नियत काय आहे हे आम्हाला माहित आहे. मोदी शहा हे डरपोक लोक आहेत. हे लोक फक्त विरोधी पक्ष फोडू शकतात, पाकिस्तान तोडू नाही शकत. पाकिस्तान तोडण्याची हिंमंत त्यांच्यात नाही. हे लोक डरपोक आणि नामर्द आहेत. डोनाल्ड ट्रम्पपुढे यांनी शेपूट घातलं असे संजय राऊत म्हणाले.
ट्रम्प यांनी धमकी दिली आहे की युद्ध थांबवा अन्यथा अदानीचे अरेस्ट वॉरंट काढू. गौतम अदानीच्या बाबतीच सौदा झाला आहे. देशापेक्षा काही महत्त्वाचे नाही पण मोदींना वाटतं की अदानी देशापेक्षा मोठे आहेत. त्यांनी देशाचा सौदा केला आणि देशाच्या सार्वभौमत्त्वाचा सौदा केला आहे. तिरंगा रॅली काढण्याची लायकी नाही. ज्या पद्धतीने त्यांनी तिरंग्याचा अपमान केला आहे, त्यानुसार त्यांना तिरंग्याला हात लावण्याचाही हक्क नाही. त्यांनी अमेरिकेचा झेंडा घेऊन इथे यात्रा काढावी.
पंतप्रधान मोदींचं भाषण हे बकवास भाषण होतं. हे विजेत्या राष्ट्राचं भाषण नव्हतं. आमचं सैन्य हे पूर्ण पाकिस्तान तोडण्याच्या तयारीत असताना तुम्ही अवसानघात केला आणि त्यांना थांबवलं. नाही तर पाकिस्तानचे दोन तुकडे पुन्हा झाले असते. वीर सावरकरांच अखंड हिंदुस्थानचं स्वप्न साकार करण्याचं स्वप्न होतं, हे स्वप्न साकार करण्याची त्यांना संधी होती. पण यांनी गौतम अदानी आणि अंबानीसाठी त्यांनी व्यापार केला. त्यांच्यासाठी व्यापार मोठा आहे देश नाही. भविष्यात सगळे सौदे बाहेर येतील. आज राहुल गांधींची पत्रकार परिषद आहे, ते ही आपली भूमिका मांडतील.
संसदेत संरक्षणाबाबात चर्चा करताना कुठल्याही मर्यादा येत नाही. जर आमच्या देशाने अमेरिकेसमोर गुढघे टेकलेले आहेत, ट्रम्प आमच्या देशाचे नेतृत्व करत असतील यावर आम्ही चर्चा करणार नसू, तर कशावर चर्चा करणार? देशात जेव्हा जेव्हा युद्ध झाली आहेत तेव्हा तेव्हा संसदेत चर्चा झाली आहे.
शरद पवार अंधारात आहेत, त्यांची राष्ट्रभक्ती वेगळ्या लेव्हलची आहे. आमची राष्ट्रभक्ती टोकाची आहे. पंतप्रधान मोदी आणि अमित शहा हे राष्ट्रभक्तीचे ढोंग करत आहे आणि राष्ट्रभक्तींच्या आडून व्यापार करत आहेत, देश अमेरिकेला विकला जातोय. पाकिस्तानशी ज्या पद्धतीने अंडर द टेबल सौदेबाजी झाली त्यावर आम्ही बोलणार. मोदी आणि शहांनी देशाला या पुढे राष्ट्रभक्तीचे प्रवचन देऊ नये, त्यांनी तो अधिकार गमावलेला आहे असेही संजय राऊत म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List