गुजरातसाठी मोदी सरकारने देशाची तिजोरी उघडली, एकाच वेळी तब्बल 77 हजार कोटींच्या प्रकल्पांची ‘सौगात’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा गुजरातला झुकते माप दिले आहे. मोदींनी गुजरातसाठी देशाची तिजोरी उघडली असून एकाच वेळी तब्बल 77 हजार कोटींच्या प्रकल्पांची ‘सौगात’ घेऊन ते उद्यापासून दोन दिवसांच्या गुजरात दौऱयावर जाणार आहेत. दौऱयाच्या पहिल्याच दिवशी ते दाहोद येथील एल लोकोमोटिव्ह उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन करणार आहेत. तसेच इलेक्ट्रिक लोकोमोटिव्हला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. त्यानंतर ते भूज येथे 53 हजार 400 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचे लोकार्पण करणार आहेत.
गुजरात दौऱयात पहिल्याच दिवशी पंतप्रधान मोदी तब्बल तीन सभा घेणार आहेत. दुसऱया दिवळी मंगळवारी मोदी वेरावळ आणि अहमदाबाद दरम्यान वंदे भारत एक्प्रेस आणि वलसाड तसेच दाहोद स्थानकांदरम्यान एका एक्प्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. त्यानंतर ते एका मालगाडीचे लोकार्पण करतील. मुख्यमंत्री असताना मोदींनी गुजरातमध्ये शहरी विकास वर्ष 2005 हा उपक्रम सुरू केला होता. या उपक्रमाला 20 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मोदी शहरी विकास वर्ष 2025, गुजरात शहरी विकास योजना आणि राज्य स्वच्छ हवा कार्यक्रम सुरू करणार आहेत.
- मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणाऱ्या प्रकल्पांमध्ये सौर ऊर्जा संयंत्र, विद्युत पारेषणच्या वाहिन्या, बंदरांचे अद्ययावतीकरण, रस्ते निर्मिती आणि धार्मिक स्थळांचा विकास अशा अनेक प्रकल्पांचा समावेश आहे. जामनगरमध्ये बाबरजार सबस्टेशन, मोरबी येथे 11 मेगावॅटचा सौर प्रकल्प, कच्छ येथे 10 आणि 35 मेगावॅटचा सौर प्रकल्प अशा प्रकल्पांचे उद्घाटन यावेळी होणार आहे. देशात बेरोजगारी वाढली असताना केवळ गुजरातमध्येच हजारो कोटींची गुंतवणूक का, असा सवाल आता विरोधक करत आहेत.
सर्व मोठे प्रकल्प गुजरातला
महाराष्ट्रात येणारे अनेक प्रकल्पही गेल्या काही वर्षांत गुजरातला नेण्यात आले. महिंद्रा कंपनीचा चीनच्या कंपनीसोबत तब्बल 25 हजार कोटींचा करार झाला होता. हा प्रकल्पही गुजरातला नेण्यात आला. स्पोर्ट सिटीही गुजरातमध्ये उभारण्यात आली. गेल्या अडीच वर्षांत महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प गुजरातला पळवण्यात आले. पाणबुडी प्रकल्पामुळे महाराष्ट्रात 150 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार होती. परंतु, हा प्रकल्पही गुजरातला नेण्यात आल्यामुळे तब्बल 50 हजार तरुणांच्या तोंडचा घास गेला. अजूनही मोदी गुजरातचे पंतप्रधान असल्यासारखे वागत असून दोन दिवसांत अनेक विकास प्रकल्पांचे लोकार्पण गुजरातमध्ये करण्यात येणार आहे. त्यावरून विरोधक मोदी सरकारला घेरण्याची शक्यता आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List