Operation Sindoor – 4 दिवसांत हिंदुस्थानने पाकड्यांना धुळ चारली, मोठी हानी झाली; न्यूयॉर्क टाइम्सचे वृत्त
जम्मू-कश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तानला पळता भुई थोडी केली. एका मागोमाग एक कठोर निर्णय घेऊन पाकड्यांना धडा शिकवला. यानंतर सर्वात महत्त्वाची मोहीम ऑपरेशन सिंदूरची घोषणा करून पाकड्यांच्या बहुतांश दहशतवादी तळांना लक्ष केले. यामध्ये 100 हून अधिक दहशतवादी ठार झाले. हिंदुस्थानच्या या यशस्वी कामगिरीला देश विदेशातून पाठिंबा मिळाला. अमेरिकेनेही हिंदुस्थानी सैन्याचे कौतुक केले आहे. अमेरिकेच्या न्यूयॉर्क टाइम्स या वृत्तपत्रात हिंदुस्थानच्या जबरदस्त कामगिरीचे वृत्त सॅटेलाइट फोटोद्वारे प्रसिद्ध करण्यात आले आहे. अमेरिकेने शस्त्रसंधी घडवून आणली. आणि या मुद्द्यावर चीन-अमेरिकेची भूमिका एकच राहिली. यामुळे विश्वासघात झाल्याची भावना हिंदुस्थानमधील नेत्यांमध्ये असून ते नाराज असल्याचे न्यूयॉर्क टाइम्सने म्हटले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल पुरस्कार घेण्याची उत्सुकता लागली आहे, अशी टीकाही या वृत्तातून करण्यात आली आहे.
हिंदुस्थान-पाकिस्तानत झालेल्या चार दिवसांच्या तणावादरम्यान पाकिस्तानला जमीनदोस्त करण्यात हिंदुस्थानला मोठे यश आल्याचे न्यूयॉर्क टाइम्सने आपल्या वृत्तात म्हटले आहे. हिंदुस्थानने पाकड्यांवर केलेले हल्ले बरेच प्रभावी होते. हिंदुस्थानने केलेल्या हल्ल्यांमुळे पाकिस्तानच्या लष्करी सुविधांची मोठी हानी झाली आहे. दोन्ही देशांमधील हा संघर्ष गेल्या पन्नास वर्षांतील सर्वात मोठा संघर्ष होता. ज्यामध्ये ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला. ऑपरेशन सिंदूरदरम्यान हिंदुस्थान सैन्याकडून अनेक फोटो आणि व्हिडीओ जारी करण्यात आले.
दरम्यान, ऑपरेशन सिंदूर सुरू असताना दोन्ही देशांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. दोन्ही देशांनी झालेल्या नुकसानाचा पाढा वाचला. मात्र हिंदुस्थानने वारंवार दिलेल्या पुराव्यांमुळे आणि घटनास्थळावरून मिळालेल्या छायाचित्रांवरून पाकिस्तानचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. युद्ध आणि अचूक शस्त्रास्त्रांच्या या युगात, दोन्ही देशांनी त्यांचे एकमोकांना प्रत्युत्तर देण्याचा चोख प्रयत्न केला. परंतु हिंदुस्थानने पाकिस्तानी हवाई दलाांना लक्ष्य केले. त्यामुळे त्यांचे नुकसान अधिक झाल्याचे स्पष्ट झाले आहे, असे न्यूयॉर्क टाइम्सने आपल्या वृत्तात म्हटले आहे.
भोलारी हवाई तळावर हल्ला
कराचीजवळील भोलारी हवाई तळावर झालेला सर्वात महत्त्वाचा हल्ला होता. जिथे सॅटेलाइट फोटोमध्ये विमान ठेवण्याच्या सुरक्षित स्थानांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट दिसून आले आहे. पाकिस्तानातील कराचीपासून सुमारे 100 किमी अंतरावर असलेल्या भोलारी एअरबेसवरील विमानाच्या गॅरेजला हिंदुस्थानने लक्ष्य केले होते.
नूर खान एअरबेस उद्ध्वस्त
अहवालानुसार, हिंदुस्थानचा सर्वात संवेदनशील हल्ला नूर खान एअरबेसवर झाला. नूरखान एअरबेस पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादजवळ आहे. हे युनिट पाकिस्तानच्या अण्वस्त्रांच्या सुरक्षेची काळजी घेते. त्यामुळे हिंदुस्थानने अचूक शस्त्रे वापरून येथील सुविधांचे नुकसान केले. सॅटेलाईट फोटोंवरून या एअरबेसचेही मोठे नुकसान झाल्याचे दिसत आहे.
सरगोधा आणि रहीम यार खान हवाई तळांवर हल्ले
हिंदुस्थानने पाकिस्तानमधील आणखी दोन प्रमुख हवाई तळांना लक्ष्य केल्याचा दावाही केला आहे. ज्यामध्ये रहीम यार खान आणि सरगोधा तळांच्या धावपट्टी विभागांचा समावेश आहे. हवाई हल्ल्यामुळे धावपट्टीवर मोठा खड्डा पडल्याचे सॅटेलाईट फोटोत दिसत आहे.
जकोबाबाद एअरबेस
हा एअरबेस आंतरराष्ट्रीय सीमेपासून 200 किलोमीटर अंतरावर असून या एअरबेसवरील हँगरला हिंदुस्थानने टार्गेट केले. हँगर म्हणजे अशी जागा जिथे विमानांची दुरुस्ती आणि देखभाल केली जाते.
या दरम्यान पाकिस्तानने हिंदुस्थानच्या उधमपूर एअरबेसवर हल्ला करून ते पूर्णपणे उद्ध्वस्त केल्याचा दावा केला होता. मात्र, 12 मे रोजी प्रसिद्ध झालेल्या सॅटेलाईट छायाचित्रांमुळे पाकिस्तानचा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.
अवहालानुसार, हिंदुस्थान-पाकिस्तानात सलग चार दिवस सुरू असलेला हा तणाव 10 मे रोजी शांत झाला. मात्र, या संपूर्ण तणावादरम्यान पाकिस्तानचे झालेले नुकसान आणि हिंदुस्थानी सैन्याची रणनिती याबाबाद अनेक पुरावे विदेशी मीडिया आणि सॅटेलाईट डाटावर उपलब्ध आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List