सोफिया कुरेशी यांच्या घरावर हल्ला झालेला नाही, कर्नाटक पोलिसांनी केला फेक पोस्टचा पर्दाफाश
हिंदुस्थान-पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर फेक न्यूजना ऊत आला आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर प्रकाशझोतात आलेल्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्या संबंधित अशीच एक फेक न्यूज व्हायरल झाली. सोफिया कुरेशींच्या बेळगावमधील घरावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्यांनी हल्ला केल्याची अफवा सोशल मीडियावर उठविण्यात आली. कर्नाटक पोलिसांनी अशा प्रकारची कोणतीही घटना घडली नसल्याचे सांगितले आणि खोटी पोस्ट डिलीट केली. त्याचदरम्यान सोफिया यांच्या कुन्नूर येथील सासरच्या घरी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली.
एक्सवर अनीस उद्दीन या अकाऊंटवरून ही खोटी पोस्ट शेअर करण्यात आली होती. कर्नल सोफिया कुरेशी आणि त्यांच्या मुलावर हल्ला झाला असून घराला आग लावण्यात आल्याचा उल्लेख या पोस्टमध्ये करण्यात आला होता. सोफिया कुरेशी यांच्या घराबाहेर मुस्लिम समाजाविरोधात द्वेषपूर्ण घोषणा दिल्या गेल्या, असाही दावा पोस्टमध्ये करण्यात आला होता. या अकाऊंटचे लोकेशन कॅनडामधील ब्रिटिश कोलम्बिया येथील दाखवले गेले. या अकाऊंटवरून 405 जणांना फॉलो करण्यात आले होते, तर त्याचे 31 फॉलोअर्स होते. विशेष म्हणजे हे अकाऊंट व्हेरिफाईड ब्लू टीक असलेले अकाऊंट होते. तसेच पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान मोहम्मद अली जीना, लष्करप्रमुख असीम मुनीर आणि इतर लष्करी अधिकाऱ्यांचा फोटो अकाऊंटला जोडण्यात आलेला होता.
बेळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुलेद यांनी सदर पोस्ट व्हायरल झाल्यानंतर अशा प्रकारची घटनाच घडली नसल्याचे स्पष्ट केले. सदर पोस्ट खोटी असून केवळ गोंधळ निर्माण करण्यासाठी केली असल्याचे त्यांनी म्हटले. सोफिया कुरेशी यांच्या कुन्नुर गावातील सासरच्या घरी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List