‘ऑपरेशन सिंदूर’वर सैफ अली खान स्पष्टच म्हणाला, “आपल्या जमिनीवर..”
पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादाविरोधात भारतीय सैन्याकडून राबवण्यात येत असलेल्या ऑपरेशन सिंदूरवर अभिनेता सैफ अली खानने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, सैफने भारत सरकारने उचललेल्या या पावलाचं कौतुक केलं आहे. “मी माझ्या सरकारसोबत आणि पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याविरोधात त्यांनी दिलेल्या प्रत्युत्तरासोबत संपूर्ण एकनिष्ठतेने उभा आहे”, असं त्याने म्हटलंय. त्याचसोबत सैफने पहलगाममधील हल्ल्यात प्राण गमावलेल्या लोकांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत.
“आपल्या जमिनीवर नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आपल्या आप्तस्वकीयांना गमावलेल्या कुटुंबीयांसाठी मी माझ्या सहवेदना व्यक्त करतो आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. त्याचसोबत मी आपल्या सशस्त्र दलांच्या हिंमतीला सलाम करतो. आम्हाला सुरक्षित ठेवल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. दहशतवादाविरोधात आपण सर्वांनी एकत्र यावं. जय जवान, जय हिंद”, असं सैफ म्हणाला.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांना उद्ध्वस्त केलं. त्यानंतर पाकिस्तानने भारताच्या सीमेवरील शहरांमध्ये हल्ले करण्यास सुरुवात केली. गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांदरम्यान अत्यंत तणावपूर्ण वातावरण आहे. ऑपरेशन सिंदूरअंतर्गत भारतीय सैन्याकडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे. अशा परिस्थितीत बॉलिवूडमधील सेलिब्रिटी व्यक्त होत नसल्याची तक्रार नेटकऱ्यांकडून सातत्याने केली जात होती. सलमान खान, आमिर खान, शाहरुख खान, सैफ अली खान यांसारखे सेलिब्रिटी ‘ऑपरेशन सिंदूर’बद्दल मौन बाळगून असल्याची टीका अनेकांनी केली होती.
नेटकऱ्यांकडून सातत्याने टीका झाल्यानंतर अमिताभ बच्चन, सैफ अली खान यांनी ऑपरेशन सिंदूरवर प्रतिक्रिया दिली आहे. तर सलमान खानने शस्त्रसंधीची घोषणा झाल्यानंतर ट्विटरवर एक पोस्ट लिहिली होती. शस्त्रसंधीच्या निर्णयाचे त्याने आभार मानले होते. परंतु काही वेळानंतर त्याने ती पोस्ट डिलिट केली. यावरून नेटकऱ्यांनी त्याला खूप ट्रोल केलंय.
दरम्यान भारताने शस्त्रसंधीची घोषणा केल्यानंतर अवघ्या तीन तासांतच श्रीनगर, गुजरातमधील कच्छ यासह सीमाभागात अनेक ठिकाणी पाकिस्तानी ड्रोनने घुसखोरी केली. लष्कराच्या हवाई सुरक्षा प्रणालीने यातील बहुतांश ड्रोन हवेतच नष्ट केले. खबरदारीचा उपाय म्हणून सीमावर्ती भागातील अनेक शहरांमध्ये शनिवारी रात्री पुन्हा ब्लॅकआऊट करण्यात आला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List