मिंध्यांनंतर भाजपची भाईंदरमध्ये कंटेनर शाखा, महापालिका आयुक्तांच्या निवासस्थानासमोरच फुटपाथ अडवला
मीरा-भाईंदरमध्ये मिंधे गटाच्या बेकायदा कंटेनर शाखेनंतर आता भाजपनेही बेकायदा कंटेनर कार्यालय उभारणार आहे. हे बेकायदा कंटेनर कार्यालय पालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांच्या कनकिया येथील निवासस्थानाबाहेर फुटपाथ अडवून तयार केला जाणार आहे. 12 मे रोजी सायंकाळी 5 वाजता भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन केले जाणार आहे. त्यामुळे नियम धाब्यावर बसवून थाटलेल्या या कार्यालयावर पालिका काय कारवाई करते याकडे भाईंदरकरांचे लक्ष लागले आहे.
सत्तेच्या जोरावर नियम धाब्यावर बसवून गेल्या तीन वर्षांत मिंधे गटाने अनेक ठिकाणी बेकायदा कार्यालये थाटली आहेत. भाईंदरमध्येही फुटपाथवर कब्जा करून कंटेनर कार्यालय थाटले होते. विशेष म्हणजे या कार्यालयात चोरून वीज घेतली होती. याविरोधात नागरिकांनी आवाज उठवल्यानंतर महापालिकेने क्रेनच्या सहाय्याने मिंध्यांचे कंटेनर कार्यालय उद्ध्वस्त करून टाकले होते. आता भाजप थेट पालिका आयुक्त राधाविनोद शर्मा यांच्या कनकिया येथील रस्त्यावर पदपथ अडवून पक्ष कार्यालय सुरू करणार आहे. 12 मे रोजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन होणार असून त्याच्या निमंत्रण पत्रिका पाठवल्या जात आहेत.
न्यायालयाच्या आदेशाचा अवमान
पदपथ हे नागरिकांना चालण्यासाठी मोकळे राहायलाच हवे. तसेच रेल्वे व बस स्थानक परिसरातही दीडशे मीटरपर्यंत फेरीवाल्यांना न्यायालयाने मनाई केली आहे. असे असताना सत्तेच्या जोरावर भाईंदरमध्ये मिंधे गटाने कंटेनर शाखांचा अक्षरशः उच्छाद मांडला आहे. शहरात मोक्याच्या जागांवर मिंधे गटाच्या 15 ते 16 कंटेनर शाखा तर भाजपची ही पहिली कंटेनर शाखा आहे.
नागरिकांनी चालायचे कुठून? आयुक्त साहेब उत्तर द्या!
सत्तेचा गैरवापर करून मिंधे गट आणि भाजप मोक्याच्या जागा अडवून आपली कार्यालये थाटत असताना पालिका प्रशासन याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करत आहे. सर्वसामान्यांवर तत्काळ कारवाई करणारे प्रशासन या बेकायदा कंटेनर कार्यालयावर कारवाई करणार का, नागरिकांनी चालायचे कसे, आयुक्त साहेब उत्तर द्या, असा संताप नागरिकांनी व्यक्त केला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List