IPL 2025 – धोनीच्या खेळाडूला डोळे वटारणे वरुण चक्रवर्तीला भोवलं; बीसीसीआयने दिला दणका, खिसा झाला मोकळा
इंडियन प्रीमियर लीगमधील 57 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज संघात रंगला. या लढतीत चेन्नईकडून पराभव स्वीकारावा लागल्याने कोलकाताच्या प्ले ऑफ गाठण्याच्या आशा धूसर झाल्या आहेत. दरम्यान, चेन्नई विरूद्धच्या लढतीत धोनीच्या खेळाडूला डोळे वटारणाऱ्या वरुण चक्रवर्ती याच्यावर बीसीसीआयने कारवाई केली आहे. वरुणला मॅच फीच्या 25 टक्के रक्कम दंड ठोठावण्यात आली आहे. तसेच 1 डिमेरीट अंकही त्याला देण्यात आला.
ईडन गार्डन्स मैदानावर रंगलेल्या लढतीत कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 179 धावा उभारत चेन्नईपुढे 180 धावांचे आव्हान ठेवले. पाठलाग करताना कोलकात्याने आयुष म्हात्रे आणि डेव्हन कॉन्वे या दोघा सलामीवीरांना शून्यावरच टिपले. मग वंश बेदीच्या जागी आलेल्या उर्विल पटेलने 11 चेंडूंत 4 षटकार आणि 1 चौकार ठोकत 31 धावा केल्या. हर्षित राणाने ही जोडी फोडली. रविचंद्रन अश्विनलाही त्यानेच बाद केले.
वरुण चक्रवर्थीने रवींद्र जाडेजाची यष्टी वाकवून चेन्नईची 5 बाद 60 अशी अवस्था केली. मात्र त्यानंतर डेवाल्ड ब्रेविस आणि शिवम दुबेने 67 धावांची आक्रमक भागी रचत चेन्नईला विजयाजवळ नेले. वैभव अरोराने एकाच षटकात शिवम दुबे आणि नूर अहमदची विकेट काढून चेन्नईला दबावाखाली आणले, पण शेवटी फिनिशर महेंद्र सिंग धोनीने संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
चेन्नईने कोलकाता जिंकले; पराभवामुळे गतविजेत्यांचे प्ले ऑफ अडचणीत
चेन्नईचा डाव सुरू असताना वरुण चक्रवर्ती याने डेवाल्ड ब्रेविस याला बाद केले. ही विकेट घेतल्यानंतर चक्रवर्तीने त्याला डोळ्याने मैदान सोडण्याचा इशारा केला. वरुण चक्रवर्ती याची कृती आयपीएल आचारसंहिता कलम 2.5 च्या लेव्हल 1 नुसार गुन्हा आहे. मॅच रेफरीसमोर चक्रवर्ती यानेही आपली चूक मान्य केली. त्यामुळे त्याला शिक्षा ठोठावण्यात आली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List