आंबेगावात पाण्यासाठी आंदोलकांच्या कालव्यात उड्या; कालव्याचे कुलूप तोडून पाणी सोडण्याचा इशारा
डिंभे धरणाच्या (हुतात्मा बाबू गेनू जलाशय) डाव्या कालव्यातून घोडशाखेला पाणी सोडले जात नसल्याचा निषेध करण्यासाठी आंदोलकांनी कालव्यात उड्या मारल्या. महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पाण्यासाठी कालव्यात उड्या मारून तसेच घोड शाखेत बसून आंदोलन केले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष देवदत्त निकम, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जुन्नर तालुकाप्रमुख माउली खंडागळे यांनी कार्यकर्त्यांसह शनिवारी दुपारी आंदोलन केले.
आंबेगाव तालुक्यातील लौकी, थोरांदळे, भराडी, जाधववाडी, नागापूर तसेच जुन्नर तालुक्यातील मांजरवाडी या गावांत पाणीटंचाई भेडसावत आहे. सध्या कडक उन्हाळा असून, पिकांना पाण्याची आवश्यकता आहे. या परिसरातील बंधारे व पाझर तलाव कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत. पिके पाण्याअभावी जळून जात आहेत.
मागील दहा दिवस घोडशाखा कालव्याला पाणी सोडण्यासाठी कुकडी पाटबंधारे विभागाकडे मागणी करत आहेत. तसेच जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडेदेखील पाणी सोडण्याबाबत मागणी केली. परंतु, केवळ आमदार आणि मंत्री यांच्या दिरंगाईमुळे मीना आणि घोड शाखेला पाणी सोडण्यास विलंब होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. या संदर्भात कार्यकारी अभियंता प्रशांत कडूसकर यांच्याशी संपर्क साधला असता, ते उपलब्ध झाले नाहीत.
आज रात्रीच घोड शाखा कालव्यात पाणी सोडावे, अन्यथा घोड शाखा कालव्याचे कुलूप तोडून पाणी सोडू, असा इशारा यावेळी देवदत्त निकम आणि माउली खंडागळे यांनी दिला. यावेळी शेतकरी संतोष मोरे, जयसिंग थोरात, गणेश यादव, वामन पवार, शंकर टेमगिरे, नामदेव विश्वासराव, दत्ता विश्वासराव, रामचंद्र म्हस्के, अण्णा मोरे उपस्थित होते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List