12 वर्षांनी मुलगा झाला, मांत्रिकाच्या नादात आईने चिमुकल्याला कालव्यात फेकलं
अंधश्रद्धेतून एक भयंकर घटना समोर आली आहे. मांत्रिकाच्या बोलण्याला भुलून एका महिलेने स्वतःच्या दोन वर्षाच्या मुलाला कालव्यात फेकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. मुलाला कालव्यात फेकताना काही लोकांनी पाहिले. यानंतर त्यांनी महिलेला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
हरियाणातील फरीदाबाद येथे ही धक्कादायक घटना घडली. मेघा लुक्रा असे ताब्यात घेतलेल्या महिलेचे नाव आहे. मेघा आणि कपिल लुक्रा यांचे 16 वर्षांपूर्वी लग्न झाले होते. हे जोडपे आपल्या दोन मुलांसह फरीदाबादच्या सैनिक कॉलनीत राहत होते. त्यांची मोठी मुलगी 14 वर्षांची आहे तर छोटा मुलगा दोन वर्षांचा होता.
मेघाला मोठ्या मुलीनंतर 12 वर्षांनी मुलगा झाला होता. मेघा गेल्या अनेक दिवसांपासून मीता भाटिया नामक तांत्रिक महिलेच्या संपर्कात होती. तुझा मुलगा पांढऱ्या जिन्नचा मुलगा आहे, तो तुझ्या संपूर्ण कुटुंबाला नष्ट करेल, असे भाटियाने मेघाला सांगितले. यामुळे मेघा खूप तणावात होती, अशी माहिती तिचा पती कपिलने पोलिसांना दिली.
याच तणावातून मेघा रविवारी सायंकाळी कुणालाही न सांगता मुलाला घेऊन घरातून गेली. यानंतर बीपीटीपी पुलावरून मुलाला आग्रा कालव्यात फेकले. पुलाजवळ उपस्थित लोकांनी मुलाला कालव्यात फेकताना पाहिले आणि त्यांनी तात्काळ मेघाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी तांत्रिक महिलेलाही ताब्यात घेतले आहे. पोलीस, अग्नीशमन दल, राज्य आपत्ती व्यवस्थापन आणि स्थानिक पाणबुडे कालव्यात मुलाचा शोध घेत आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List